सर्वांत मोठ्या विमान कंपनीत क्रू मेंबर म्हणून काम करण्याची संधी
मुंबई, 17 जुलै : एखाद्या विमान कंपनीत क्रू मेंबर म्हणून कामाची संधी मिळावी, असं अनेक तरुण-तरुणींचं स्वप्न असतं. तुम्हीदेखील यासाठी प्रयत्न करत असलात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण देशातली सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियात लाखो युवकांना रोजगाराची मोठी संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. यासाठी एअर इंडिया कंपनीने नियोजन सुरू केलं आहे. `समाचार जगत डॉट कॉम`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
देशातली सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियात लवकरच दर महिन्याला 500हून अधिक क्रू मेंबर्सची भरती केली जाणार आहे. यासाठी एअरलाइन लवकरच एक नवीन क्रू रोस्टरिंग प्रोजेक्ट सुरू करणार आहे. शुक्रवारी (14 जुलै) कंपनीच्या सीईओंनी ही माहिती कर्मचाऱ्यांना साप्ताहिक संदेशाच्या माध्यमातून दिली आहे. या वर्षी फेब्रुवारीत एअर इंडियाने 470 अत्याधुनिक प्रवासी विमानांची ऑर्डर दिली आहे. यासाठी कंपनीने अमेरिकेची बोइंग आणि फ्रान्सच्या एअरबस कंपनीशी विमान खरेदीचा जगातला सर्वांत मोठा करार केला आहे. एअर इंडियाने गेल्या 16 वर्षांत एवढी मोठी ऑर्डर प्रथमच दिली आहे. तुम्हाला माहितीये का ISRO चा फुल फॉर्म? कशी मिळते इथे नोकरी, किती असतो पगार ? आता एअर इंडिया एका महत्त्वाकांक्षी परिवर्तन योजनेचा भाग म्हणून क्रू रोस्टरिंग प्रोजेक्ट हाती घेत आहे. याबाबत एअर इंडिया या टाटा ग्रुपच्या एअरलाइनचे सीईओ कँपबेल विल्सन यांनी माहिती दिली. ते म्हणाले, `दर महिन्याला 500हून अधिक नवीन क्रू मेंबर्सची नियुक्ती केल्याने आम्हाला संपूर्ण क्रू प्रशिक्षित करता येईल. या प्रोजेक्टमुळे विमान कंपनीला क्रूची नेमणूक करता येईल, बाजारात उपलब्ध नवीन तंत्रज्ञान अवलंबता येईल आणि क्षमता निर्माण करता येईल.` `कंपनीने आपल्या क्रू मेंबर्ससाठी सॉफ्टवेअर विकसित केलं आहे, जेणेकरून ते उर्वरित वर्षासाठी अधिक संघटित आणि निश्चित रोस्टरचा लाभ घेऊ शकतात. या मदतीने त्यांना विमान कंपनीची परिचालन क्षमता वाढवता येईल,` असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं. यापूर्वी मे महिन्यात एअर इंडियाच्या सीईओंनी सांगितलं होतं, की `टाटा समूहाच्या सर्व चार एअरलाइन्समध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 20,000 असेल.` या वर्षी आतापर्यंत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने 3900हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. त्यात 500हून अधिक पायलट्स आणि 2400 केबिन क्रू सदस्यांचा समावेश आहे. सीईओ विल्सन यांनी सांगितलं, की `कंपनी क्रू मेंबर्सना चांगलं सहकार्य करण्याच्या दिशेने काम करणार आहे. कारण आणीबाणीच्या प्रसंगाच्या कॉल-अपसाठी प्रशिक्षित क्रू स्टँडबायवर असणं गरजेचं असतं,` असं `ईटी`ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.