नवी दिल्ली, 15 एप्रिल : शैक्षणिकदृष्ट्या इयत्ता 10 वी आणि 12 वीला विशेष महत्त्व आहे. कारण विद्यार्थ्यांच्या जीवनाला आणि करिअरला तिथूनच दिशा मिळते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) शैक्षणिक क्षेत्र (Education Sector) पुरतं विस्कळीत झालं. अर्थात त्याचा परिणाम या परीक्षांच्या (Exam) नियोजनावर झाला. परंतु, आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्राची विस्कटलेली घडी सुरळीत होत आहे. त्यातच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education) अर्थात ‘सीबीएसई’ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘सीबीएसई’ने (CBSE) पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सिंगल मोड एक्झाम (Single Mode Exam) घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ सध्या असलेलं दोन टर्मचं (Two Terms) धोरण रद्द करण्यात येईल. याबद्दल अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या साथीपूर्वी ‘सीबीएसई’नं दोन टर्मबाबत निर्णय घेतला होता. या विषयीचं वृत्त ‘टीव्ही नाइन हिंदी’ने दिलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पुढील शैक्षणिक वर्षापासून सिंगल मोड एक्झाम अर्थात एकदाच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा एकदाच आयोजित केल्या जाणार आहेत. कोरोना महामारीपूर्वी `सीबीएसई`ने बोर्ड परीक्षांची दोन भागांमध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टर्मच्या बोर्ड परीक्षा मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आल्या. दुसऱ्या टर्मची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, `शाळांकडून निवेदनं आल्यानंतर बोर्डानं एकच परीक्षा पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. `सीबीएसई`ने कधीही जाहीर केलं नव्हतं, की दोन टर्म परीक्षांचं स्वरूप कायम राहील.` ( देशातल्या या राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार, काही भागात पडणार मुसळधार पाऊस ) `सीबीएसई`च्या अभ्यासक्रमाबाबत (Syllabus) बोलायचं झालं तर, `सीबीएसई`ने गेल्या दोन वर्षांत स्वीकारलेलं धोरण कायम राहील. अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. शाळा सध्याची पुस्तकं वापरून कमी केलेला अभ्यासक्रम शिकवू शकतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (National Education Policy) सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात दोन वेळा बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी प्रस्तावित आहे. त्यात एक मुख्य परीक्षेसाठी आणि एका सुधारणेसाठीच्या परीक्षेचा समावेश आहे. परंतु, इयत्ता 10 वी आणि 12 वीसाठी बोर्ड परीक्षा कायम राहील. एनईपी अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020नुसार, कोचिंग क्लासेस सुरू करण्याची गरज दूर करण्यासाठी बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या सध्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यात येणार आहे. सध्याच्या मूल्यमापन प्रणालीच्या या हानिकारक परिणामांवर मात करण्यासाठी आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी बोर्ड परीक्षांची पुनर्रचना केली जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की `आता शाळा पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्या आहेत. तसंच विद्यार्थीदेखील शाळांमध्ये येत आहेत. त्यामुळे एकाच वेळी बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.` याविषयी सीबीएसईकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मागील परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षा आणि अंतर्गत गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं गेलं.