कोण घेणार तमाशाला वाचवण्याची ‘सुपारी’?

ढोलकीची थाप… घुंगरांचा छनछनाट आणि टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट … हा अस्सल गावरान नजराणा सध्या पाहायला मिळतोय गावच्या जत्रेत…गावची जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तमाशा आणि तमाशा ठरवायचा म्हटलं कि पावलं वळतात ती मुक्काम पोस्ट नारायणगावकडे..

Ajay Kautikwar
रायचंद शिंदे, प्रतिनिधी,न्यूज18 लोकमत ढोलकीची थाप… घुंगरांचा छनछनाट आणि टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाट … हा अस्सल गावरान नजराणा सध्या पाहायला मिळतोय गावच्या जत्रेत…गावची जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तमाशा आणि तमाशा ठरवायचा म्हटलं कि पावलं वळतात ती मुक्काम पोस्ट नारायणगावकडे..पुणे जिल्ह्यातील नारायणगाव(ता.जुन्नर ) हे तमाशा फडमालकांचं माहेर. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नारायणगाव येथे 350 पेक्षा जास्त फड़ मालकांनी गावच्या जत्रेचे करार केले. तर या माध्यमातून सुमारे ९ कोटीं पेक्षा जास्त रकमेची उलाढाल झाली आहे. दरवर्षी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर राज्यातील तमाशा फडमालक आपल्या राहुटया म्हणजेच तात्पुरती  बुकिंग कार्यालय  नारायणगाव या  ठिकाणी उभारुन ती आकर्षक पद्धतीने सजवतात. गुढी उभारून या फडमालकानी  यात्रेकरूंचे स्वागतही केले आणि आपल्या नव्या वर्षाच्या व्यवसायाचा शुभारंभ केला. गावच्या जत्रेत करमणूकीसाठी रात्रीच्या वेळी तमाशा ठेवण्याची परंपरा असून गावपुढारी या ठिकाणी येवून त्याचं बुकिंग करतात. याला सुपारी देणं असंही म्हणतात.  मागील ८० वर्षांपासूनची ही परंपरा असल्याचं तमाशा अभ्यासक डॉ. मिलिंद कसबे यांनी सांगितलं

नाचते मी पोटासाठी                 "नाचते मी पोटासाठी"  हे शब्द आणि ढोलकीची थाप कानावर पडताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो तमाशा... एकेकाळी रसिकांच्या हृदयात आदराचे स्थान असलेल्या तमाशा कलेला आज मात्र उतरती कळा लागलीय. वरुणराजाची अवकृपा,  तर कधी अवकाळी आणि गारपिटीने भुईसपाट झालेली  हातातोंडाशी आलेली शेती. परिणामी वाढणारी जीवघेणी महागाई. अशा अनेक अडचणींचा सामना सध्या तमाशा कलावंतांना करावा लागतोय. परंतु  सावकाराकडून कर्ज घेत या सर्व संकटांवर मात करीत तमाशा  फडाचे मालक गावांच्या यात्रांमध्ये करमणुकीसाठी कलेच्या माध्यमातून आपलाही सहभाग नोंदवत खारीचा वाटा उचलताहेत.तमाशासाठी धडपडसध्या महाराष्ट्रातील ग्रामदैवतांच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू असून, गावागावात करमणूकीला  तमाशा  हा  असतोच. मात्र, समस्यांचा डोंगर समोर उभा ठाकला असला तरी तमाशा कलावंत पोटाची खळगी भरण्यासाठी व रांगडी कला टिकवण्यासाठी गावोगावच्या प्रेक्षकांचे  मनोरंजन करत भटकंती करताहेत. गावकुसाबाहेरच्या मोकळ्या रानात फडातील ही  मंडळी वेळ मिळेल तसा सराव करतात. उघड्या माळरानावरचा आपल्या मुला-बाळांसोबत हा फिरता संसार सावरत भटकंती सुरू आहे. या कलावंतांचा प्रवासही धोकादायक ट्रकमधूनच असतो. माळरानावर भुकेची भ्रांत मिटवणे आणि साजशृंगारही अर्थात तिथेच केला जातो.तमाशा पोटासाठी               बैलगाडा शर्यतबंदी असल्याने त्यावर होणारा  खर्च तमाशावर होणार असून, गावकरी कमी बजेटच्या तमाशाना  प्राधान्य देत आहेत. महागाईचा मोठा सामना या फडमालकांना सतावतोय. काही दशकांपूर्वी तमाशाच्या तिकीटबारीवर रसिक प्रेक्षकांची गर्दी ओसंडून वाहत असे... टाळ्या-शिट्ट्यांसह पैशांचा पाऊसही पडत असे... मात्र, काळ बदलला, महागाई वाढली अन तमाशा ही कला लोप पावू लागली... परंतु, वीतभर पोटासाठी आणि संसाराचा रहाटगाडा हाकण्यासाठी हालचाल तर हवीच; मग ती हालचाल कलेच्या माध्यमातून का असेना... दुष्काळ जरी असला, तरी गावची यात्रा होणारच, हाच ट्रेंड सध्या गावा-गावात आहे. मग गावच्या जत्रेत जर तमाशा नसेल तर त्या यात्रेला अर्थ नाही असं ग्रामीण भागात समजलं जातं. कारण ही आहे आपली मराठमोळी परंपरा… तमाशाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभो आणि या कलेला पुन्हा सोनेरी दिवस येवोत.तमाशाचा बाज बदलल्यामुळे हल्ली तमाशाला ऑर्केस्ट्राचा लूक आलाय, हे जरी खरे असले तरी शृंगारिक लावण्या आणि लावणी कलावंतांना मोठी दाद यानिमित्ताने मिळतच असते. यामुळे समाजातील अनेक स्तरातील तरुण मुली तमाशाकडे वळत आहेत ती केवळ पोटासाठी.

Trending Now