भाषा निवडा :

मराठी
पुढची बातमी
UPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्याने दाखल केली तक्रार

प्रकाश मेहता तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्याच !

एसआरए घोटाळ्यामुळे विरोधक आणि स्वतःच्याच पक्षातून दबाव वाढल्यानंतर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. पण माध्यमांसमोर नेतिकतेचा अर्विभाव दाखवणारे मेहता खरंच राजीनामा देतात का हेच पाहायचंय. प्रकाश मेहतांच्या वादग्रस्त कारकिर्दीवर 'आयबीएन लोकमत'चे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांचा हा परखड ब्लॉग...

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक

एक आठवड्यापासून विधिमंडळात घुमणारा एकच प्रश्न आहे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता राजीनामा देणार का ? झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचाराच्या निमित्ताने सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्यापासून सुरु झालेल्या गृहनिर्माण विभागाच्या वाभाड्यांचे लोण जसे मेहतांपर्यंत पोहचले तसे सगळेच पक्ष सक्रिय झाले. कधी नव्हे ते विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटील या विषयावर आक्रमक झाले. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले इतकंच नाही तर सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेनेही या प्रकरणावरुन भाजप आणि फडणवीस सरकारला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे प्रकाश मेहता या विषयावर बोलतील, अशी खात्री होतीच. त्यानुसार ते बोललेही, 'मला मुख्यमंत्र्यांनी पद सोडायला सांगितले तर त्यासाठी मी तयार आहे,' असे सांगून मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खरेतर या प्रकरणातून 'सुटका'च केलेली आहे.

आता मुख्यमंत्री याविषयी काय निर्णय घेतात, की, त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे कौल मागतात, यावर मेहतांचे भवितव्य अवलंबून असेल. पण तूर्तास त्यांना जो न्याय सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार याना लावलेला आहे, तो न्याय, म्हणजेच, गृहनिर्माण विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरु असेपर्यंत मेहता यांना बाजूला केले पाहिजे. तरच या प्रकरणातील दोषी व्यक्तींपर्यंत पोहचणे शक्य होईल. आणि मुख्य म्हणजे त्याद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला तडा जाणार नाही. याआधी ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच फडणवीस यांनी ज्यापद्धतीने धडक कारवाई केली होती, त्याचा भाजप-सेना सरकारच्या प्रतिमा संवर्धनासाठी चांगलाच फायदा झाला होता. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे झाल्यानंतरही फडणवीस सरकारने रोखठोक भूमिका घेतल्याचे अजूनही लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे हे मेहता प्रकरण सुद्धा तेवढ्याच गांभीर्याने घेतले जावे, अशी लोकांची अपेक्षा असेल तर त्यात काहीच गैर नाही.

सावित्री नदीवरील पूल कोसळला त्याला ३ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यावेळी रायगडचे पालकमंत्री असणारे प्रकाश मेहता अपघात घडल्यानंतर गायब होते. त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न बराचकाळ अपयशी ठरला होता. ते कमी म्हणून की काय, मेहता ज्यावेळी घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांची वार्ताहरांशी बाचाबाची झाली. या गुटखाफेम वाचाळवीर मंत्र्यांची ही कहाणी तिथेच थांबत नाही, पालकमंत्री प्रकाश मेहतांचा त्यावेळेसचा नदी पुलावरचा 'सेल्फी'ही बराच वादग्रस्त ठरला होता, मुख्यमंत्री या दुर्घटनेबाबत प्रसार माध्यमांशी बोलत असताना हे पालकमंत्री 'महाशय' चक्क 'सेल्फी' काढण्यात दंग होते. नेमकं हेच चित्रं कॅमेऱ्यात कैद झाल्याने मेहता त्यावेळीही चांगलेच वादग्रस्त ठरले होते.

विधिमंडळात जेव्हा, जेव्हा खडसे, तावडे, पंकजा मुंडे आदी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा गाजत होत्या, तेंव्हा संसदीय कामकाज खाते सांभाळणारे मेहता मध्येच उठून विरोधकांना आव्हान द्यायचे की, "आम्ही चौकशी केली तर तुमचे सारे ८० आमदार घरी जातील". विशेष म्हणजे, आज जेव्हा मेहता अडचणीत आलेले आहेत, तेंव्हा त्यांना मदत करण्यासाठी, त्यांची बाजू लावण्यासाठी मंत्रिमंडळातील एकही सहकारी पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे मेहता घरी जाणार अशी चिन्हे दिसताहेत. विशेष म्हणजे, एरवी ज्यांच्यावर सरकारच्या बाजूला गेल्याचा नेहमी आरोप होतो, ते विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील जेव्हा मेहतांच्या राजीनाम्यासाठी आग्रही दिसू लागले तेंव्हा राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होऊ लागले. विखे-पाटील यांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आणि भाजपचे स्थानिक नेतृत्व मेहतांच्या राजीनाम्यासाठी "वातावरण निर्मिती" करतंय की काय, अशी जोरदार चर्चा सुरु झाली. आता खुद्द मेहतांनी पुढे येऊन "मला मुख्यमंत्र्यांनी पद सोडायला सांगितले तर त्यासाठी मी तयार आहे" असे सांगितल्यामुळे वातावरण निवळण्यास मदत होईल, असे वाटते. मुख्य म्हणजे, मेहता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाची वाट न पाहता, आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून स्वत: राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे एवढीच अपेक्षा.
First published: August 4, 2017, 6:23 PM IST