आठवण 'पत्रकार' लोकमान्य टिळकांची, निमित्त लोकमान्यांच्या पुण्यतिथीचं

टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या 'केसरी' दैनिकाचं मोठं योगदान आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा अग्रलेख लिहून ब्रिटिश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या 'पत्रकार' टिळकांची कामगिरी मोठी आहे.

Sonali Deshpande
चित्ततोष खांडेकर, मुंबईभारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणारं आणि लढणारं एक धोरणी आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक किती चुकले किती बरोबर आहेत याच्या कितीही चर्चा झाल्या तरीही टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले योगदान कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. किंबहुना भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या 'असंतोषाचे जनक' म्हणूनच त्यांना ओळखलं जातं. टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या 'केसरी' दैनिकाचं मोठं योगदान आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा अग्रलेख लिहून  ब्रिटिश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या 'पत्रकार' टिळकांची कामगिरी मोठी आहे.भारतात पत्रकारिता ही पाश्चिमात्य जगाच्या  तुलनेत फारच उशिरा आली. त्याहीपेक्षा पत्रकारितेचे महत्त्व समजायला आणि उमजायला फार वेळ लागला. पण देशाला इंग्रजांच्या विरूद्ध जागं करायचं असेल, स्वातंत्र्याची लढाई जर समर्थपणे लढायची असेल तर पत्रकारितेसारखं दुसरं हत्यार नाही हे टिळकांनी चांगलंच हेरलं होतं. अमेरिकन क्रांतीही पूर्णपणे माध्यमांनी पुढे नेली होती. केसरी आणि मराठासारखे वर्तमानपत्र टिळकांनी सुरू केले. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून टिळकांनी काय साधलं? टिळकांना अपेक्षित क्रांती साधता आली का? आणि खरंच याचा येत्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर काय परिणाम झाला?

त्यांचे हितचिंतक तुम्हाला असं लिहिल्याने कैद होऊ शकते तेव्हा असं लिहू नका असं वारंवार सुचवायचे. पण वर्तमानपत्र ही सरकारला खूश करण्यासाठी नाही तर सरकार सामान्यांवर जो अन्याय करतंय,ज्या धोरणांनी सरकार या देशचं नुकसान करतंय ती धोरणं तो अन्याय लोकांसमोर आणणे याचसाठी आहेत ही टिळकांची धारणा होती. आज जगाला हादरवून सोडणाऱ्या पनामा पेपर्ससारख्या प्रकरणावर आणि त्यातल्या आरोपींवर जेव्हा  भारतीय माध्यमं मुक गिळून गप्प बसतात तेव्हा खरोखरच निर्भीडपणे जिवाची पर्वा न करता पत्रकारिता करणाऱ्या टिळकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.1906 साली टिळकांवर पुन्हा एकदा राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला. यावेळी टिळकांनी  भारतीयांच्या सहिष्णुतेलाही मर्यादा असतात असं बजावलं होतं आणि सरकारवर विनाशकाले विप्रीत बुद्धी नावाच्या लेखातून सडकून टीका केली होती. यावेळी पुन्हा एकदा टिळकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं आणि टिळकांचे वकील मात्र मोहम्मद अली जिन्ना होते. यावेळी टिळकांना सहा वर्षांचा तुरूंगवास सुनावण्यात आला. टिळकांवर आयुष्यात तीनदा राजद्रोहाचा खटला भरला आणि तिन्हीदा त्यांना शिक्षा झाली तरीही टिळकांनी सरकारविरूद्ध  लिहिणे चालूच ठेवले.फक्त राजकीयच नाही, तर सांस्कृतिक आणि धार्मिक प्रश्नांवरही टिळक लिखाण करत असत पण ते सारंच टिळक स्वातंत्र्याशी जोडतं. गीतेचा सार सांगताना त्यांनी कर्मयोग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटत राहा, या हेतूनेच सुचवला होता. लढत राहा स्वातंत्र्याची अपेक्षा करू नका, कारण लढलो तर ते नक्की मिळेल अशी टिळकांची धारणा होती.टिळकांच्या काळात भारतातले इंग्रजी वर्तमानपत्र सरकारची तळी उचलण्यातच धन्यता मानत होते. प्रादेशिक भाषांमध्ये इतकं प्रभावीपणे पत्रकारिता रूजवणाऱ्या टिळकांवर या इंग्रजी वर्तमानपत्रांनी सडकून टीका केली. सत्य उघडकीस आणल्याबद्दल एका पत्रकारावरच माध्यमांनी टीका करण्याची भारतीय इतिहासातील ही पहिलीच घटना असेल. पण टिळकांनी कोणालाच भीक घातली नाही. आयुष्यभर आपल्या पत्रकारितेतून स्वराज्यासाठी लढत राहिले. पुढे गांधीजींनीही टिळकांचा आदर्श घेत पत्रकार होऊन समाजाचे प्रबोधन आणि ब्रिटिशांवर टीका करणं चालूच ठेवलं आणि स्वतंत्र होईपर्यंत टिळकांची परंपरा पुढे नेली.ज्याप्रमाणे मार्क्स आपल्या लेखांमधून भांडवलदारांवर आसूड ओढून शोषितांची बाजू मांडत राहिला तसेच  गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या आपल्या बांधवाना सोडवण्यासाठीही लोकमान्य टिळक झटत राहिले. त्यामुळेच आजच्या प्रसारमाध्यमांनाही टिळकांकडून धडा घ्यायची नितांत गरज आहे.

Trending Now