नवी दिल्ली, 5 डिसेंबर : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहन वापरण्याच्या फायद्यांबाबत माहिती दिली आहे. पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहन चालवणं किती स्वस्त ठरतं, यामुळे तुमच्या पैशांची किती बचत होते याबाबत गडकरींनी माहिती दिली आहे. ‘आजतक’च्या एका कार्यक्रमात बोलताना नितिन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहन वापराच्या फायद्यांबाबत सांगितलं. सध्या आपण देशात 8 लाख कोटी रुपयांचं पेट्रोलियम आयात करतो. येणाऱ्या काळात हे वाढून 25 लाख कोटी रुपयांवरही जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला याच्या पर्यायी वापरावर लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
इलेक्ट्रिक गाड्यांबाबत बोलताना त्यांनी येणाऱ्या काळात सरकार पेट्रोल-डिझेल गाड्या बंद करणार नसल्याचंही सांगितलं. परंतु पेट्रोल-डिझेलला इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय असेल, असं ते म्हणाले. त्याशिवाय पर्यायी इंधन म्हणून बायो फ्यूल आणि फ्लेक्स फ्यूल इंधनासारख्या गोष्टींवरही विचार, अभ्यास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
पेट्रोल गाडी चालवताना एका किलोमीटरसाठीचा खर्च 10 रुपये येतो. तर डिझेलवर हा खर्च 7 रुपये येतो. अशात इलेक्ट्रिक वाहनाचा एका किलोमीटरसाठीचा खर्च केवळ 1 रुपये आहे. पेट्रोल गाडीवर तुमचा महिन्याचा खर्च 20000 रुपये आहे. तर तोच इलेक्ट्रिक गाडीवरचा खर्च 1500 ते 2000 रुपये असेल. यामुळे पेट्रोल गाड्यांसाठी खर्च होणाऱ्या महिन्याच्या 18000 रुपयांची बचत होऊ शकते, असंही ते म्हणाले.
दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. पेट्रोल-डिझेल गाड्यांमुळे होणारं प्रदूषण हेदेखील दिल्लीतील प्रदूषणाचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास या प्रदूषणात कमी करता येऊ शकतं, असंही गडकरी म्हणाले.