मुंबई, 06 मे : सध्या शेतकऱ्यांचे शेती या एका व्यवसायावर उदरनिर्वाह करणे अशक्य होत चालले आहे. मागच्या १० वर्षात अस्मानी संकटांनी शेतकरी खचून चालला आहे. यामुळे शेतकऱ्याला शेती सोबत जोडधंदा म्हणून पशूपालन किंवा अन्य व्यवसाय करणे गरजेचं होत चाललं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या (farmer suicide) थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी जोडधंदा सुरू करणे गरजेचे आहे. शेतीस जोडधंदा (Agriculture side business) म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायास सर्वात जास्त पसंती दिली जाते. दुग्धव्यवसाय सुरू करायचा असेल तर अलीकडील काळात म्हशींच्या बरोबरीने किंबहुना त्याहून अधिक गायींना अधिक पसंती दिली जाते. (buying a cow)
खास करून देशी गायींकडे आता ओढा वाढत आहे. कारण या गायींच्या दुधाला भरपूर मागणी आणि नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरणारे देशी गायींचे मलमूत्र. यामुळे आज ग्रामीण भागात अनेक शेतकर्यांनी, त्यांच्या पुढच्या पिढीतील नवयुवकांनी गायी-म्हशी संगोपनाकडे मोर्चा वळवला आहे.
हे ही वाचा : सुवर्णसंधी! कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएट असाल तरी चालेल; 'या' बँकेनं केली मोठ्या भरतीची घोषणा; करा अर्ज
जास्त दूध देणार्या गायीची वासरे जास्त दूध देणारी असतात. कारण त्यांच्याकडे मातेकडून अधिक दुग्ध उत्पादनासाठी लागणारी रंगसूत्रे व गुणसूत्रे आलेली असतात. म्हणून गाय विकत घेताना तिच्या वंशावळीसंबंधी जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करावा.
दूध काढतेवेळी गायीला पान्हा सोडण्यास वेळ लागतो का किंवा दूध देतेवेळी तिला पान्हा सोडण्यासंबंधी काही वाईट सवयी आहेत का? याबाबत दक्षता घ्यावी. कारण काही गायी फार हट्टी असतात. अशा गायींची विक्री करून अनेकदा फसवणूक झाल्याची उदाहरणे आहेत. म्हणून पान्हावयास किती वेळ लागतो, हे पाहणे अतिआवश्यक आहे. (Agriculture side business)
गाय शांत आहे का तापट याबाबत गायीला हाताळून माहिती मिळवावी. काही गायींमध्ये त्यांच्या जातीनुसार मुळातच शांत किंवा तापट स्वभाव आढळतो. जसे सर्वात गरीब गायी म्हणून गीर किंवा काठेवाडी ओळखल्या जातात. म्हणून दुधाळ गाय निवडताना ती तापट आहे का शांत, याची माहिती फारच आवश्यक असते. खिल्लार गायींचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. सर्व गायींच्या जातींमध्ये खिल्लार गाय सर्वांत जास्त तापट आणि मारखोर असते. अशा गायी फारच कमी दूध देतात.
गाय खरेदी करताना गायींचे मालक आपल्यासमोर दूध काढून दाखवितात. परंतु बर्याचवेळा दूध तुंबवून हे दूध काढून दाखविल्यामुळे फसगत केली जाते. म्हणून आपल्या समक्ष दोन वेळा दूध काढून घ्यावे.
दूध काढताना ते खात्रीशीर माणसास काढण्यास सांगावे. म्हणजे कासेत आणि सडात काही दोष आहेत का, याबाबत माहिती मिळविता येईल. तसेच ती गाय दूध काढावयास हलकी आहे का जड हेसुद्धा कळेल.
गायीचे एकूण प्रकृतिमान अभ्यासणे महत्त्वाचे असते. गाय निवडताना ती लठ्ठ नसावी. कारण लठ्ठ गायीला आजार लवकर होतात. चांगले दूध देणारी गाय कधीही लठ्ठ होत नसते व तिच्या छातीच्या शेवटच्या तीन फासळ्या दिसत असतात.
काही शेतकरी गाभण गायी विकत घेण्यासाठी पसंती दर्शवितात. कारण अशा गायी स्वस्त मिळतात. गाभण गाय विकत घेताना दुसर्या किंवा तिसर्या वेताची गाय विकत घ्यावी. कारण कालवड दिसण्यास चांगली असली तरी ती विकत घेण्यासंबंधी काही धोके असतात. पहिले वेत हे कोणत्याही प्राण्यात धोक्याचे असते. प्रथम वेताच्या गायी किती दूध देतील याचा अंदाजही करता येत नाही.
दुधाळ गायींमध्ये मुख्यत्वे करून पुढील लक्षणे असतात. कातडी मऊ असते. कासेवरील शिरा जाड, मोठ्या आणि नागमोडी असतात. सडाची लांबी व दोन सडांतील अंतर व ठेवण सारखी असते. दूध काढल्यानंतर कासेची संपूर्ण घडी दिसते. गायीचे स्वरूप आकर्षक, डोळे पाणीदार असतात. शरीराचा आकार गोलाकृती असण्याऐवजी त्रिकोणाकृती असतो. वरीलप्रमाणे गाय खरेदी करताना सर्वसामान्य सूचना अमलात आणल्यास दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यात शेतकर्यांना फारशा अडचणी येणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cow science, Farmer