कोल्हापूर, 02 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात भरड धान्याबद्दल घोषणा केली आहे. भरड धान्य आता 'श्री अन्न' म्हणून ओळखले जाणार आहे. ज्वारी, बाजरी, नागली,नाचणी, कुट्टू, राजगिरा, कोंदरा, कुटकी, वरी, राळा आदींचा यामध्ये समावेश होतो.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या भरड धान्याला श्री अन्न हा शब्द वापरून सांगितले आहे की, भारत हा श्री अन्नाचा सर्वात मोठा उत्पादक आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे. भारताला श्री अन्नाचे जागतिक केंद्र बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आयआयएमआर हैदराबादला याबाबत जागतिक हब बनवण्यासाठी मदत केली जाईल, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
...म्हणून श्री अन्न म्हणून समावेश करण्यात आला
भरड धान्यांची पौष्टिकता लक्षात घेऊनच त्यांचा श्री अन्न म्हणून समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विविध ठीकाणी या श्री अन्न पैकी पिके घेतली जातात. तर नंदुरबार आणि नाशिक याबरोबरच कोल्हापूरच्या डोंगराळ भागात नाचणीचे पीक घेतले जाते, असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता तथा विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
कोल्हापुरातील संशोधन केंद्रात विविध भरड धान्यांवर संशोधन सुरू असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मार्फत मुख्य भरड धान्यांचे अनेक सुधारित वाण प्रसारित करण्यात आलेले आहेत. यामध्ये ज्वारी पिकाच्या एकूण 13 वाण, बाजरी पिकाचे 5 वाण, नाचणीचे आणि कुटकी/वरी/वरईचे 2 नवे वाण प्रसारित केलेले आहेत, अशी माहिती देखील सूर्यवंशी यांनी दिली.
भरड धान्यांच्या ऐवजी श्री अन्न म्हणून नामकरण
ज्या भरड धान्यांचा पारंपारिक अन्न म्हणून आपल्या देशातील आहारात समावेश असायचा, त्यालाच आज भरड धान्यांच्या ऐवजी श्री अन्न म्हणून नामकरण केलेले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर 2022 च्या अर्थसंकल्पात देखील या भरड धान्यांच्या बाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 2023 हे वर्ष संपूर्ण देशभरात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे, असे कोल्हापूरच्या विभागीय कृषी केंद्रातील प्रभारी अधिकारी तथा नाचणी पैदासकार डॉ. योगेश बन यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने उत्पादन व उत्पादकता वाढ, पोषण मूल्य व आरोग्य विषयक फायदे, मूल्यवर्धन, प्रक्रिया व पाककृती विकास, नवउद्योगातून व्यावसायिक दृष्टीकोन वाढवणे, प्रचार प्रसिद्धीतून जनजागृती निर्माण करणे, निर्यात वृद्धी, धोरणात्मक निर्णयातून अंमलबजावणी या बाबींचा विचार करण्यात आला होता. त्यानुसार केंद्र सरकारच्या विविध योजना देखील कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना कसा याचा फायदा करून देता येईल याचा प्रयत्न सरकार करत आहे, अशी माहिती देखील बन यांनी पुढे दिली.
Union Budget 2023 : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बजेटमधून काय मिळालं? पाहा Video
इंडीयन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चरल रिसर्च यांच्या अंतर्गत इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च ही संस्था हैदराबाद येथे कार्यरत आहे. या संस्थेमार्फत संपूर्ण भारतात पिकवल्या जाणाऱ्या भरड धान्यांच्या संदर्भात संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी नाचणी आणि इतर तृणधान्याचे संशोधन केंद्र कोल्हापूर येथे आहे. या ठिकाणी होणाऱ्या संशोधनाची दिशा आयआयएमआर हैद्राबाद येथेच ठरते.
उपपदार्थ निर्मिती अशा पातळीवर काम केले जाईल
आता सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून आयआयएमआर हैदराबादला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या भरड धान्यातील पिकांचे मूल्यवर्धन, आहारातील वापर आणि उपपदार्थ निर्मिती अशा पातळीवर काम केले जाईल. नवीन उद्योजक विकास आणि रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण देखील या केंद्रामार्फत दिले जाते. मग आता फक्त हैदराबाद पुरते मर्यादित न राहता या संस्था आता भारतभर त्यांचे काम करणार आहे. त्यांचे जे उपकेंद्रांचे जाळे पसरलेले आहे, त्यांच्या मार्फत त्या त्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भरड धान्य पिकांवर हे काम केले जाईल, अशी माहिती योगेश बन यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Kolhapur, Local18