नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 15 फेब्रुवारी : नागपूरची जशी संत्रीमुळे ओळख आहे तशी जालन्याची मोसंबीमुळे ओळख आहे. मात्र, यंदा मोसंबी झाडावर वाढलेल्या मंगू रोगाचा प्रकोपामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. मंगूच्या प्रादुर्भावामुळे फळे काळे पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात 30 ते 40 टक्के घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कशामुळे वाढतो रोगाचा प्रकोप? मृग बहार मोसंबी वर मोठ्या प्रमाणावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. झाडावर असलेल्या बुरशीमुळे या रोगाचा प्रकोप वाढतो. एकदा प्रादुर्भाव झाला की फवारणीचा विशेष परिणाम पाहायला मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. मोसंबी दरावर देखील परिणाम होत आहे. मंगू रोगाचा प्रादुर्भाव नसलेल्या मोसंबीला प्रतिटन 15 ते 20 हजार एव्हढा दर मिळत आहे. तर मंगू रोगाचा प्रादुर्भाव असलेली मोसंबी केवळ 10 ते 12 हजार रुपये प्रतिटन दर मिळत. यामुळे बाजारात मोसंबीला ग्राहक मिळत नाही आहेत, असं शेतकरी विलास धुपे यांनी सांगितले.
मंगू रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना? मंगू रोग हा सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मोसंबी फळावर पाहायला मिळतो. याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना डायकोफॉलची 2 मिली प्रती लिटर पाण्यात फवारणी करावी. तसेच शेताच्या पश्चिम दिशेला धूर करावा. बाग तण विरहित ठेवावा. या उपाय योजना केल्यास मोसंबी बागेतील मंगू रोगावर नियंत्रण मिळवता येतं, असं शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना सुनील कळंब यांनी सांगितले.
Beed News: ज्वारी काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांपुढं गंभीर प्रश्न! कशी सुटणार अडचण? Video
दरम्यान, जालना मोसंबी बाजरपेठेमध्ये 100 ते 150 टन मोसंबीची आवक होत असते. जालना वरून मोसंबी दिल्ली, हरियाणा, पंजाब या राज्यात पाठवली जाते. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, बदनापूर आणि जालना तालुक्यात मोसंबीचे क्षेत्र मोठे आहे. मागील तीन वर्षांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, मोसंबी पिकावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने आहेत त्या बागा जगविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.