विशाल रेवडेकर (सिंधुदुर्ग), 22 फेब्रुवारी : सिंधुदुर्गात फळांचा राजा हापूस आंबा बदलत्या वातावरणाच्या विळख्यात सापडला असून वाढत्या उष्णतेमुळे आंबा अडचणीत आला आहे. सिंधुदुर्गात यावर्षी थंडीचे प्रमाण कमी अधिक होत असल्याने आंबा बागेला फळधारणा झालीच नाही. केवळ समुद्राकडील पट्ट्यात काही अंशी आंबा पिक आले तर उर्वरित भागात आंबा पिकाला फुलोरा येत असतानाच उष्णतेच्या फटक्यात आंबा पीक सापडले आहे.
आंब्यावर कुजलेल्यासारखे डाग तयार होत आहेत. रात्री कमी होणारे तापमान आणि दिवसा अचानक वाढणारे तापमान याच्या तफावतीमुळे हा परिणाम आंब्यावर होत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे आंबा बागायतदार शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. मागच्या चार दिवसांत उन्हाचा पारा वाढल्यामुळे कडक ऊन जाणवत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तयार झालेला हापूस उन्हाच्या चटक्याने भाजून गळू लागला आहे.
हे ही वाचा : दुष्काळी खानापुरात स्ट्रॉबेरीची शेती, पाहा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, Photos
अचानक वाढलेल्या तापमानाचा देवगड हापूस आंब्यावर परिणाम जाणवू लागला आहे. काही ठिकाणी फळे बाधित होत आहेत. कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत आंबा उत्पादन चांगले असल्याचे बोलले जात होते. परंतु उन्हाच्या असह्य झळा आणि थंडीचा अचानक होणार परिणाम याचा फटका रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात आंब्याच्या बागा करपत असल्याचे चित्र आहे.
सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. सध्या जिल्ह्यात रात्री उशिरा गारवा, तर दिवसभर प्रचंड उष्णता असे चित्र आहे. गेल्या पाच-सहा दिवसांत तर जिल्ह्याच्या बहुतांश भागातील तापमान 37 अंशांपेक्षा अधिक वाढले आहे. या वाढलेल्या तापमानाचा फटका आंबा आणि काजू पिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे यंदा आंब्याची आवक मार्केटमध्ये कमी झाल्यास दर वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Nagpur News : मिरचीनं शेतकऱ्यांना हसवलं, निर्यात वाढल्यानं आले ‘अच्छे दिन’
आंबा पिकांवर काही ठिकाणी फळे बाधित होण्यास सुरुवात झाली आहे. आंब्याला काळे डागदेखील पडत आहेत. या शिवाय थ्रीप्स, तुडतुड्यांचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या वर्षी पहिल्या टप्प्यात अत्यल्प झाडांना मोहोर आला होता. परंतु दुसऱ्या टप्प्यात थंडीमुळे चांगला मोहोर आला. या मोहोराला सध्या फळधारणा होत आहे. वाढलेल्या उष्णतेचा या फळांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.