पॅरिस, 31 मे : जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा व्हिंचीची (Leonardo da Vinci) अजरामर कलाकृती म्हणजे ‘मोनालिसा’ (Mona Lisa). या मोनालिसाच्या चित्राबद्दलचं गूढ इतकी वर्षं झाली तरी कायम आहे. पॅरिसच्या लोव्हेर (Louvre) म्युझियमध्ये हे पेंटिंग ठेवण्यात आलं आहे. पॅरिसला भेट देणारे पर्यटक आवर्जून हे पेंटिंग बघण्यासाठी जातात. त्यामुळे इथं पर्यटकांची कायमच गर्दी असते. अशातच रविवारी मोनालिसाच्या पेंटिंगवर एका व्यक्तीनं पांढरं क्रीम टाकलं. व्हीलचेअरवर बसलेली ही व्यक्ती विग आणि लिपस्टिक लावून ज्येष्ठ महिलेच्या वेशात होती. पर्यटक शांतपणे हे चित्र बघत होते. त्यावेळेस व्हीलचेअरवर बसलेली ही व्यक्ती अचानक उठून पळत गेली आणि त्यानं या चित्रावर केक फासला. अर्थातच त्यामुळे इथं काही गोंधळही उडाला होता. त्यापूर्वी त्यानं गॅलरीतून गुलाबाची फुलंही टाकली होती. सुदैवाने या पेटिंगवर संरक्षक काच बसवण्यात आल्यानं थेट कलाकृतीवर कोणताही परिणाम झाला नाही. याबाबतचं वृत्त बीबीसी च्या वेबसाईटवर देण्यात आलं आहे. “इथं गर्दी होती आणि आम्ही वर बघत होतो. तेवढ्यात व्हीलचेअरवर बसलेली एक ज्येष्ठ महिला पेटिंगच्या दिशेने धावत आली आणि या चित्रावर बुक्के मारायला लागली. त्यानंतर त्या व्यक्तीनं पेटिंगवर क्रीम फासलं,” अशी माहिती या म्युझियममध्ये अमेरिकेहून आलेल्या 20 वर्षांचा पर्यटक ल्युक संडबर्ग (Luke Sundberg) यानं दिली. तो या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. “त्या माणसाला पकडून नेण्यासाठी सुरक्षारक्षकांना फक्त 10 ते 15 सेकंदच लागली. पण त्यानंतर गर्दीमध्ये थोडी अस्वस्थता पसरली होती. या घटनेमुळे अर्थातच तिथे गोंधळ उडाला होता. मोनालिसा ही कलाकृती किती ऐतिहासिक आहे याचा विचार केला पाहिजे. अशी कलाकृती, असा क्षण लाखो वर्षांतून एकदाच येतो,” अशी प्रतिक्रियाही त्यानं व्यक्त केली. ल्युकनं या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.
Maybe this is just nuts to me💀but an man dressed as an old lady jumps out of a wheel chair and attempted to smash the bullet proof glass of the Mona Lisa. Then proceeds to smear cake on the glass, and throws roses everywhere all before being tackled by security. 😂??? pic.twitter.com/OFXdx9eWcM
— Lukeee🧃 (@lukeXC2002) May 29, 2022
हे कृत्य करणाऱ्या 36 वर्षांच्या तरुणाला तिथल्या सुरक्षारक्षकांनी तातडीनं पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. “पृथ्वीबद्दल विचार करा. सगळे कलावंत हेच सांगतात. त्यामुळे मीही तेच सांगण्यासाठी हे कृत्य केलं,” पकडल्यानंतर हा तरूण ओरडून सांगत होता. “अनेकजण पृथ्वीचा नाश करत आहे. त्याबद्दल विचार करा. हे सांगण्यासाठीच मी हे कृत्य केलं,” असं या व्यक्तीचं म्हणणं होतं. या तरुणाला पकडून पोलीस दलाच्या मानसोपचार विभागात पाठवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या कलाकृतीचं काही नुकसान झालं आहे का, याबद्दलही तपास सुरु केला असल्याची माहिती त्यांनी दिली. या ऐतिहासिक कलाकृतीवर 1950 मध्ये ॲसिड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्यावर संरक्षक काच बसवण्यात आली. या पेटिंगवरचं क्रीम साफ केल्यानंतर तिथे जमलेल्या पर्यटकांनी टाळ्या वाजवल्याचं मि. संडबर्ग यांच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर “अशी घटना कशीकाय घडू शकते,” असा सवाल अल्बानियातील एक पर्यटक क्लेव्हिस या 26 वर्षांच्या तरुणानं केला आहे. या घटनेवरील प्रतिक्रियेसाठी बीबीसीनं लोव्हेर म्युझियमशी संपर्क साधला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र खरोखरच ऐतिहासिक कलाकृतीपर्यंत पोहोचून त्याचं नुकसान करेपर्यंत तिथली सुरक्षा व्यवस्था काय करत होती, असा प्रश्न विचारला जात आहे.