नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना स्वच्छतेचे धडे देताना दररोज अंघोळ (Bath) करायला शिकवतात. तरीदेखील काही आळशी मुलं अंघोळ करण्यास टाळाटाळ करतात. काहीही कारणं देऊन अंघोळीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात. विशेषत: हिवाळ्यात तर अंघोळन करणाऱ्या मुलांचं आणि मोठ्या माणसांचंही प्रमाण जास्तच असतं. प्रत्यक्षात पाहिलं तर नियमित अंघोळ करणं ही एक चांगली आणि आरोग्यदायी सवय आहे. कारण दररोज अंघोळ केल्यानं शरीरातला रक्तप्रवाह (blood circulation) सुरळीत राहतो आणि शरीराचं तापमानदेखील (Body temperature) नियंत्रणात राहतं, मात्र या सर्व गोष्टी माहिती असूनही ब्रिटनमधली एक महिला आठवड्यातून फक्त एकदाच अंघोळ करते.
नताली किंग (Natalie King) असं या 49 वर्षीय महिलेचं नाव असून, ती एका शाळेत शिक्षिका आहे. इंग्लंडमधल्या डॉर्सेट (Dorset, England) या ठिकाणी ती आपला 45 वर्षीय पती जेमी याच्यासोबत राहते. गंमत म्हणजे नतालीचा नवरा पेशाने प्लंबर आहे, तरीदेखील ती पाण्यातून लांब पळते. 'द सन' वेबसाइटच्या वृत्तानुसार, नताली आठवड्यातून एकदाच अंघोळ करते आणि आठवड्यातून एकदाच डिओडरंट (Deodorant) वापरते.
दररोज अंघोळ न करण्याचं 'हे' आहे कारण -
नतालीनं आपल्या दररोज अंघोळ न करण्याच्या सवयीची (Bathing Habit) काही कारणं दिली आहेत. व्यवसायानं प्लंबर असलेल्या तिच्या नवऱ्यानं तिच्यासाठी एक अतिशय सुंदर बाथरूम (Bathroom) तयार केलेलं आहे. त्यात बबल बाथ (Bubble bath) आणि आकर्षक लायटिंगचीदेखील सोय करण्यात आलेली आहे. तरीही तिला दररोज अंघोळ करावीशी वाटत नाही. नतालीचं असं म्हणण आहे, की मानवी शरीर स्वत:चं स्वतःला स्वच्छ करतं. त्यामुळं दररोज अंघोळ करण्याचा काहीही उपयोग नाही. तिच्या दररोज अंघोळ न करण्याच्या सवयीसाठी तिचा भूतकाळदेखील कारणीभूत आहे. नताली लहान असताना गरिबीमुळे तिची आई तिला आठवड्यातून एकदाच अंघोळ घालायची. तिला तिचे लांब केस धुणं आणि त्यांचा गुंता सोडवणंही कठीण वाटायचं. म्हणून ती शक्यतो अंघोळ टाळतच असे. या गोष्टींमुळे तिला कमी वेळा अंघोळ करण्याची सवय लागली.
नताली दररोज स्वच्छ कपडे घालून शाळेत नोकरीसाठी जाते आणि कपड्यांना वास येऊ नये म्हणून कपड्यांवर परफ्यूम लावते. 'मी जरी दररोज अंघोळ करत नसले, तरी अंडरआर्म्स आणि प्रायव्हेट पार्ट्स (Private Parts) दररोज सुती कापडानं स्वच्छ करते,' असं नतालीनं सांगितलं आहे. बाकीचं शरीर स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून एकदा अंघोळ करते. विशेष म्हणजे तिचा नवरा जेमीदेखील तिच्यावर अंघोळीसाठी दबाव आणत नाही. 'नताली साबणाचा (Soap) खर्च वाचवते,' असे गमतीशीर टोमणेही तो तिला ऐकवतो. जेमी आणि नतालीनं 2006 मध्ये लग्न केलेलं आहे. तिला तिच्या पहिल्या पतीपासून 27 वर्षांचा मुलगादेखील आहे. आपल्या पत्नीची विचित्र सवय माहिती असूनही जेमी तिची आणि आपल्या सावत्र मुलाची खूप काळजी घेतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news