झांसी, 30 मे : काही दिवसांपूर्वीच आरबीआयने 2 हजारची नोट बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आता 2 हजाराच्या नोटा बाळगणारी व्यक्ती ही नोट कशी बदलायची अथवा खर्च करायची या संभ्रमात आहेत. या नोटा खर्च करण्यासाठी काहीजण पेट्रोलपंप गाठत आहेत तर काही सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करत आहेत. या सगळ्यात झाशीतील महिलांनी 2000 रुपयांच्या नोटा खर्च करण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे. पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने लोक 2000 रुपयांच्या नोटा घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचत आहेत आणि वेगवेगळ्या योजनांमध्ये खाती उघडत आहेत. यातील सर्वाधिक संख्या महिलांची आहे. पूर्वी लोक तक्रार करायचे की पोस्ट ऑफिसमधून 2000 रुपयांच्या नोटा का बदलल्या जात नाहीत. मात्र महिलांनी या समस्येला संधी म्हणून पाहिले आणि वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवले. गेल्या 3 दिवसांत बचत खात्याची 75 खाती, रिकरिंग 70 खाती, महिला उत्पन्न योजनेची 33 खाती, टाइम डिपॉझिटची 111 खाती, सुकन्या समृद्धीची 24 खाती, महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची 15 खाती, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची 15 खाती तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची 3 खाती उघडण्यात आली आहेत.
खाते उघडणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. झाशी हेड पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ पोस्टमास्टर राजू कुमार यांनी सांगितले की, अधिकतर लोक बचत योजनेतही गुंतवणूक करतात. पण 2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर लोक या नोटा वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये गुंतवत आहेत. खाती उघडणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असून ती सातत्याने वाढत आहे.