नवी दिल्ली, 12 एप्रिल : आनंदाचा क्षण असो किंवा दु:खाचा, मित्रांसोबत बसून ड्रिंक करण्याची अनेकांना सवय असते. आयुष्यात काही चांगलं घडलं असेल तर मित्रांसोबत ड्रिंक करून आनंद साजरा केला जातो आणि वाईट काही घडलं असेल तर ड्रिंक करता-करता दु:खं व्यक्त केलं जातं. प्रसंग कोणताही असो वाईन, बिअर, व्हिस्की किंवा कोणत्याही कॉकटेलनं भरलेला ग्लास उचलून तोंडाला लावण्यापूर्वी ‘चीअर्स’ म्हणण्याची प्रथा आहे. पण, असं का केलं जातं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘चीअर्स’ या शब्दाचा उगम chiere या प्राचीन फ्रेंच शब्दापासून झाला आहे, ज्याचा अर्थ ‘चेहरा’ किंवा ‘डोकं’ असा आहे. 18 व्या शतकापर्यंत, आनंद आणि प्रोत्साहन व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून या शब्दाचा वापर केला जात असे. ड्रिंकनं भरलेला ग्लास उचलून तोंडाला लावण्यापूर्वी ‘चीअर्स’ म्हणण्याच्या प्रथेमागे अनेक कारणं आहेत. जेव्हा अनेक लोक उत्सव किंवा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा ते त्यांच्या मनातील भावनांची एकता दर्शवण्यासाठी ड्रिंक असलेले ग्लास चीअर्स म्हणून टोस्ट करतात म्हणजे उंचावतात.
चीअर्स करण्यामागे ड्रिंक करण्याच्या अनुभवाचा संपूर्ण आनंद घेणं, हेदेखील एक कारण आहे. आपण कोणत्याही ड्रिंकची चव आणि वास घेऊ शकतो, त्याला बघू आणि स्पर्श करू शकतो मात्र, आपण त्याचा आवाज ऐकू शकत नाही. म्हणून ग्लास टोस्ट करून आणि चीअर्स म्हणून आपल्या पंचेंद्रियांसाठी संपूर्ण अनुभव तयार केला जातो. ड्रिंक करण्यापूर्वी ग्लास टोस्ट करण्याची प्रथा विषबाधेच्या चिंतेतून विकसित झाल्याचं म्हटलं जातं. टोस्टिंगची ही प्रथा प्राचीन ग्रीसमध्ये उगम पावली. त्यावेळी विषबाधा आणि विषप्रयोग ही सर्वांत जास्त चिंतेची बाब होती. पाहुण्यांना सुरक्षेची हमी देण्यासाठी यजमान त्यांच्यासमोर एका कॉमन डिकेंटरमधून ग्लासमध्ये वाईन ओतत असे आणि वाईनमध्ये कोणतीही भेसळ नाही हे दर्शवण्यासाठी स्वत: ती पित असे. नंतर यजमान आपला ग्लास पाहुण्यांसमोर धरून आणि त्यांनाही पिण्यासाठी आमंत्रित करत असे. हेही वाचा - Video : नादी नाय लागायचं; तरुणाने रागात उचलला हात; तरुणीने त्याची केली भयानक अवस्था अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये ड्रिंकचे ग्लास टोस्ट करण्याचा संबंध देवतांचा सन्मान करण्याशी जोडलेला आहे. देवासमोर ड्रिंकचा ग्लास टोस्ट करून चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जात असे. ग्रीक आणि रोमन परंपरांमध्ये, अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक पेये देवांना अर्पण केली जात होती. ड्रिंकचे ग्लास टोस्ट करण्याचा संबंध दुष्ट आत्म्यांशीही जोडला गेलेला आहे. ग्लासमधील थोडं ड्रिंक जमिनीवर सांडल्यास दुष्ट आत्मे आपल्यापासून दूर राहतात, असं पूर्वी म्हटलं जाई. जर्मन परंपरेनुसार, उत्सवादरम्यान ड्रिंकचे ग्लास वाजवल्यास आणि ड्रिंक करताना जोरात ओरडल्यास कोणतेही भूत किंवा दुष्ट आत्मे घाबरतात.