नवी दिल्ली, 24 मार्च : आजही आपल्या देशामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला महत्त्वाचं स्थान आहे. मग ती बस वाहतूक असो किंवा रेल्वे वाहतूक, लाखो नागरिक दररोज प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. रेल्वे आणि बसपैकी बस वाहतुकीचा पसारा जास्त मोठा आहे. कारण, देशाच्या खेड्यापाड्यांमध्ये बस जाते. बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात बस ड्रायव्हर आणि कंडक्टर महत्त्वाची भूमिका बजावतात. ते नियमितपणे ठरलेल्या वेळी कित्येक प्रवाशांना आपल्या इच्छितस्थळी पोहोचवण्याचं काम करतात. या दैनंदिन नोकरीमध्ये त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव येतात. 30-35 वर्षांच्या नोकरीमध्ये कंडक्टरचं आपल्या प्रवाशांशी एक वेगळंच भावनिक नातं तयार होतं. मुंबईतील एका 58 वर्षांच्या बस कंडक्टरची गोष्ट अशीच आहे. 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' नावाच्या फेसबूक पेजनं या कंडक्टरची गोष्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे.
मूळचे बेळगावचे रहिवासी असलेले हे कंडक्टर आपली गोष्ट सांगतात, "बस कंडक्टर म्हणून 33 वर्षांच्या नोकरीत मला अनेक अनुभव आले. मला अनपेक्षितपणे अनेक मित्र मिळाले. एक दिवस माझ्यासारखाच मार्ग काढणारा एक माणूस मला स्टेशनवर भेटला. तो म्हणाला, ‘अरे मास्टरजी, चाय पीने चलते है!’ या एका वाक्यावर आमची मैत्री झाली. पण, सर्वात भावस्पर्शी गोष्ट तर ही ठरली जेव्हा एका गरोदर मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीची जबाबदारी माझ्यावर दिली. त्यांना खात्री होती की, बस प्रवासादरम्यान मी त्यांच्या मुलीकडे लक्ष देईन आणि तिला सुरक्षितपणे इच्छितस्थळी पोहचवेन. मी जणू त्यांच्या कुटुंबातील सदस्यच आहे असं मानत त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला."
हेही वाचा - Video : समुद्राच्या वादळात मोठं क्रूझ उलटलं, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
आर्मी ऑफिसर होण्याचं स्वप्न घेऊन वयाच्या 18व्या वर्षी हे कंडक्टर काका बेळगावहून मुंबईत आले होते. त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर होते तर आई एका फॅक्टरीमध्ये काम करायची. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे नव्हते. सुरुवातीला मुंबईत ते मावशीकडे राहिले. स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी लहान-मोठी कामं करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी टेलरिंग, हेल्पर आणि सेल्समन सारखी अनेक कामं केली. तेव्हा त्यांना दिवसाचे 300 रुपये मिळायचे. 1990 मध्ये त्यांना बस कंडक्टरची नोकरी मिळाली आणि ते महिन्याचे तीन हजार रुपये कमवू लागले.
स्थिर नोकरी असल्यामुळे त्यांच्या मावशीनं त्याचं लग्न लावून दिलं. याबाबत बोलताना कंडक्टर काका म्हणतात, "माझं कल्पनाशी लग्न झालं. पहिल्याच भेटीत ती मला आवडली होती. दर आठवड्याला मी तिला चौपाटीवर घेऊन जायचो. लवकरच मी वडील झालो. काम आणि कुटुंबाच्या जबाबदारीत इतकी वर्षे कधी लोटली समजलंच नाही. 33 वर्षांच्या नोकरीनंतर या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये मी रिटायर झालो. त्या दिवशी मला आयुष्यातील सर्वात मोठं सरप्राईज मिळालं. नोकरीच्या शेवटच्या दिवशी माझ्या मुलांनी डबल डेकर बस भाड्याने घेतली. ती फुगे आणि बसच्या तिकीटांनी सजवली. आम्ही बसमध्येच केक कापला आणि माझं आवडतं गाणं गायलं. मुलांनी मला माझं आयुष्य खास असल्याची जाणीव करून दिली."
आपल्या 33 वर्षांच्या नोकरीबद्दल कंडक्टर काका सांगतात, "मी या तीन दशकांमध्ये मुंबईचा लँडस्केप बदलताना पाहिलं आहे. मी या शहराची वाढ पाहिली आहे. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, मी लोकांना त्यांचं प्रेम व्यक्त करताना, त्यांच्या आवडत्या जेवणाचा आनंद घेताना, फोनवर रडताना, त्यांच्या कामाबद्दल चर्चा करताना, त्यांच्या घरची आठवण काढताना आणि त्यांना एकटेपणाचा आनंद घेताना पाहिलं आहे. जेव्हा मी या सर्व गोष्टींकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते - आपण सर्व कुठून आलो आहोत किंवा आपण किती वेगळे आहोत हे महत्त्वाचे नाही. शेवटी आपण सर्वजण या आयुष्यरूपी बसमधील प्रवासी आहोत."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bus conductor, Viral, Viral post