तेराण 19 सप्टेंबर : महसा अमिनी या इराणी तरुणीच्या मृत्यूच्या निषेधार्थ इराणमध्ये सध्या आंदोलनं केली जात आहेत. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या आहेत, तर काही महिलांनी केस कापून, हिजाब जाळून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट (Iranian Women Burn Hijab, Cut Hair) केले आहेत. हे व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी इराणमध्ये महसा अमिनी या 22 वर्षीय तरुणीला इराणमधील ‘संस्कृतीरक्षक पोलिसांनी’ अटक केली होती. योग्य पद्धतीनं हिजाब परिधान न केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. मात्र काही वेळात ती कोमात गेल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या या कारवाईविरोधात आता इराणमधील महिला पेटून उठल्या आहेत. इराणमध्ये संस्कृतीरक्षक पोलिसांनी (Morality Police) महसा अमिनी या तरुणीला योग्य हिजाब परिधान न केल्यामुळे अटक केली होती. देशात लागू केलेल्या इस्लामसमर्थक कायद्याचं जबरदस्तीने पालन करायला लावण्याचं काम हे पोलीस करतात. आता पोलिसांच्या या कारवाईला महिलांनी अनोख्या पद्धतीनं विरोध केला आहे. अनेक स्त्रिया त्यांचे केस कापून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. मसिह अलिनेजाद या इराणी पत्रकार आणि कार्यकर्तीनं ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओला देखील लोकांना असंख्य प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या व्हिडिओत महिला त्यांचे केस कापताना दिसत आहेत. काही महिला त्यांचे हिजाब जाळतानाही दिसत आहेत. काही महिला पुरुषांसारखे वेष परिधान करत याला विरोध करत आहेत, असं ‘द इंडिपेंडंट’वृत्तपत्रानं म्हटलंय. सोशल मीडियावर हे व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहेत. अमिनी राहत होती, त्या साकेझ या गावात अनेक आंदोलकांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. इराणच्या कुर्दिस्तान प्रांतातील जवळपासच्या गावांमधून लोक आंदोलन करण्यासाठी येत आहेत असं रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलं आहे. इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खामनेई यांच्याविरोधातही आंदोलकांनी घोषणा दिल्या असून काही महिलांनी घोषणा देत असताना डोक्यावरचा स्कार्फही काढून टाकला. या आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.
सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या एका व्हिडिओत एका आंदोलकाला डोक्यावर जखम झाल्याचं दिसत आहे. हे बर्डशॉटमुळे झाल्याचं कोणीतरी बोलत असलेलं व्हिडिओमध्ये ऐकूही येतंय, मात्र रॉयटर वृत्तसंस्थेनं हे व्हिडिओ अधिकृत असल्याला दुजोरा दिलेला नाही. इराण वायर वेबसाईट व शार्घ वृत्तपत्र या पर्शियन भाषेतील माध्यमांनी अमिनीच्या कुटुंबियांचं म्हणणं मांडलं आहे. अमिनीला अटक होण्यापूर्वी ती ठणठणीत होती, मात्र अटक झाल्यानंतर लगेचच ती कोमात गेली व तिला रुग्णालयात नेण्यात आल्याचं अमिनीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. अमिनीच्या डोक्याला जखम झाली होती, असं इराणमधील संघर्षावर नजर ठेवणाऱ्या 1500tavsir या चॅनलनं म्हटलं आहे. अमिनीच्या मृत्यूबाबत चौकशी सुरु झाली आहे. फॉरेन्सिक चाचण्यांचे अहवाल येण्यासाठी तीन आठवडे लागू शकतात, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितलं आहे. अमिनी हिला मारहाण झाल्याचं काही वृत्त नसल्याचं अंतर्गत व्यवहार मंत्री अब्दुलरेझा रहमानी फझील यांनी इराणच्या सरकारी टीव्हीला सांगितलं आहे.