पाटणा 18 एप्रिल : मध्यप्रदेशच्या (Madhya pradesh) गुना येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक महिला पोलीस कर्मचारी कोरोनाचा संसर्ग वाढत (Corona in India) असल्यामुळे लावलेल्या संचारबंदीदरम्यान तिच्या छोट्या मुलाला कडेवर घेऊन कर्तव्य बजावत आहे. ही महिला आई असण्यासोबतच खाकी वर्दीतलेही कर्तव्य जबाबदारीने पार पाडत आहे, याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होत असून त्यांचे कौतुक केले जात आहे. खरं तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी कठीण परिस्थितीमध्ये कर्तव्य बजावणं, ही काही नवीन बाब नाही. तरीही कोरोनाचं संक्रमण पसरत असताना जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत लहान मुलाला कडेवर घेऊन ड्युटीवर येणे ही बाब मोठ्या धैर्याची आहे. दीपम गुप्ता असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दीपम गुप्ता या गुना पोलीस ठाण्यातील कर्मचारी आहेत. कोरोना संचारबंदीमध्ये अन्य पोलिसांसोबतच दीपम यांचीही फिल्डवर ड्युटी लावण्यात आली. त्यांना पोलीस ठाण्यात मोबाईल युनिटमध्ये पाठवले गेले, आता कर्तव्य बजावताना दीपम खाकीवर्दीसह आई असल्याचीही जबाबदारी पार पाडत आहेत. हे वाचा - ‘भारतानं मिळालं त्यातच समाधानी राहावं’; हॉट स्प्रिंग आणि गोगरामधून सैन्य माघारीस चीनचा नकार लहान मुलाला सोबत घेऊन ड्युटी करणाऱ्या दीपम यांना अन्य पोलीस कर्मचारीही मदत करत आहेत. गरज पडल्यास तेही या छोट्या मुलाला कडेवर घेऊन खेळवत आहेत. लहान मुलाच्या खाण्यापिण्याचीही सोय करत आहेत. दरम्यान, कोरोना संक्रमणाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, महिला पोलीस कर्मचारी दीपम यांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर केलेली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओची माहिती पोलीस अधीक्षक राजीव कुमार मिश्रा यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ या महिला पोलीस कर्मचाऱ्याला फील्डवरून पुन्हा ठाण्यामध्ये कामासाठी बोलावले आहे. मुलालासोबत घेऊन ड्यूटी करावी लागणे, ही बाब पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेतली असून या महिलेची फिल्ड ड्यूटी रद्द करण्यात आली आहे. मात्र, कठीण परिस्थितीत आपले कर्तव्य बजावून या महिला पोलिसाने उदाहरण घालून दिले आहे. त्यामुळे त्यांना मोठा आदर मिळत आहे, खाकी वर्दीतल्या आईच्या समर्पणाला सर्वजण सलाम ठोकत आहेत. हे वाचा - COVID-19 : चाचणी ते उपचार; लक्षणांसोबत कोरोनाबाबत तुम्हाला हे माहीत असायला हवं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.