मुंबई, 20 जून : तुम्हाला ‘थ्री इडियट्स’मधील तो सीन आठवतोय का ज्यात आमीर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी आमंत्रण नसताना एका लग्नात चांगलं जेवायला जातात. असे किस्से फक्त चित्रपटातच नाही, तर खऱ्या आयुष्यातही घडतात. पण दरवेळी फक्त जेवायला जाणारे हे बिन बुलाए मेहमान म्हणजेच आमंत्रण नसणारे पाहुणे त्या ठिकाणाहून सुखरुप बाहेर पडतील असं नाही. काही पकडले जातात आणि नंतर गोंधळही होतो. असाच काहीसा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. या संदर्भात ‘हिंदुस्थान टाइम्स’ने वृत्त दिलं आहे. रात्री उशिरा लग्नाच्या पार्टीत जेवायला जाणं एका 24 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलं. 13 जून रोजी गोरेगावचा रहिवासी जावेद कुरेशी त्याचा 17 वर्षीय चुलत भाऊ आणि काही मित्रांसोबत बाहेर गेला होता. ते जोगेश्वरीला पोहोचल्यावर त्याचा चुलत भाऊ आणि मित्रांनी एका कम्युनिटी हॉलमध्ये लग्न सुरू असल्याचं पाहिलं. वधू-वरांच्या कुटुंबीयांशी संबंध नसतानाही सर्व तरुणांनी कम्युनिटी हॉलमध्ये प्रवेश केला आणि जेवण करायला सुरुवात केली. त्यानंतर जे घडलं त्याची या तरुणांनी कल्पनाही केली नसेल.
सर्व जण जेवण करत असताना यजमान कुटुंबातील काही लोक त्यांच्या जवळ आले आणि त्यांच्याशी बोलू लागले. ओशिवरा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सर्व तरुण आमंत्रण नसताना तिथे आल्याचे लक्षात येताच यजमान आक्रमक झाले. त्या कुटुंबाने तरुणांना मारायला सुरुवात केली. त्यानंतर हे सर्व तरुण तिथून बाहेर पडण्यासाठी पळू लागले. पळत पळत ते हॉलच्या बाहेर रस्त्यावर आले. तिथे काही पाहुण्यांनी हस्तक्षेप केला आणि यजमान कुटुंबाला तरुणांना मारहाण करण्यापासून रोखलं." Viral Video : चालत्या ट्रेनमध्ये तरुणीचा जीवघेणा स्टंट, बाहेर डोकं काढलं आणि…. पुढे पोलीस म्हणाले, “या सर्व गोंधळानंतर हे तरुण पार्किंगमधून त्यांची स्कूटर घेण्यासाठी जाण्यास घाबरत होते. त्यामुळे मध्यस्थी करणाऱ्या एका व्यक्तीला जावेदने स्कूटर बाहेर आणण्याची विनंती करत त्याच्या स्कूटरची चावी दिली. मात्र, स्कूटर परत देण्याऐवजी ती व्यक्ती ती घेऊन पळून गेली.” या तरुणांना आमंत्रण नसताना जेवायला जाणं चांगलंच महागात पडलं आहे. यजमानांकडून अपमान आणि मारहाण तर झालीच शिवाय त्यांना स्कूटरही गममावी लागली. शनिवारी जावेद कुरेशीने ओशिवरा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली. त्यानंतर स्कूटर नेणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.