मुंबई 11 ऑक्टोबर : वैद्यकीय क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणं दिसून येतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून मोठी गाठ काढणं, गिळलेली वस्तू काढणं किंवा एखादा आजारासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया करत रुग्णाला दिलासा देणं याबाबत आपण नेहमीच वाचतो, ऐकतो. सध्या बिहारमधली अशीच एक घटना जोरदार चर्चेत आहे.
22 वर्षांच्या एका युवकाच्या पोटात अडकलेला 5.5 इंचाचा स्टीलचा ग्लास शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश आलं आहे. यासाठी तंत्राचा वापर करत कोलोस्टॉमी नावाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हा ग्लास युवकाच्या पोटात नेमका कसा गेला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोटदुखी ही अत्यंत सामान्य समस्या आहे. चुकीचा किंवा अवेळी आहार घेतल्यास पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. काही लोक पोट दुखू लागलं तर घरीच उपचार घेतात तर काही लोक दवाखान्यात जातात. तीव्र पोटदुखीमुळे असाच एक तरुण डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टरांनी आणखी काही तपासण्या केल्या असता, त्या तरुणाच्या पोटात एक स्टीलचा ग्लास अडकल्याचं दिसून आलं.
वृत्तानुसार बिहारमधील बेतिया येथील नशेत असलेल्या एक 22 वर्षांचा तरुणाला काही दिवसांपूर्वी तीव्र पोटदुखी आणि शौचावाटे रक्तस्रावाचा त्रास जाणवत होता. आजाराचं गांभीर्य लक्षात घेत त्याला तात्काळ पाटण्यातील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात दाखल करण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्या पोटात 14 सेमी (5.5 इंच) लांबीचा स्टीलचा ग्लास अडकल्याचं दिसून आलं.
हा ग्लास शरीरात जाऊन अडकल्याने त्याच्या गुदद्वारातून रक्तस्राव होत होता. नुकतीच या तरुणावर कोलोस्टॉमी नावाची शस्त्रक्रिया करण्यात आली. हा तरुण नशेत असताना त्याच्या शरीरात हा ग्लास गेला असावा, त्यामुळे त्याला ही गोष्ट स्पष्टपणे आठवत नसावी, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
रुग्णालयात या तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेचं नेतृत्व करणारे डॉ. इंद्रशेखर कुमार म्हणाले, ''11 डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रियेच्या माध्यमातून रुग्णाच्या पोटातून स्टीलचा ग्लास यशस्वीपणे बाहेर काढला. यासाठी कोलेस्टॉमी नावाची शस्त्रक्रिया केली. अडीच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत आतड्याला एक छिद्र पाडलं गेलं. त्यानंतर त्यात एक पिशवी बसवली गेली. जखम लवकर बरी होण्यासाठी ही पिशवी उपयुक्त ठरते. काही दिवसांनी या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येईल आणि जानेवारी महिन्यात त्या तरुणाच्या पोटातील कोलोस्टॉमी म्हणजे पिशवी काढली जाईल.''
काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना मध्य प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यात घडली होती. तेथील एका व्यक्तीच्या पोटाच्या खालच्या भागात खूप वेदना होत होत्या. वेदना सहन न झाल्याने त्याला भिंड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला रक्त तपासणी, अल्ट्रासाउंड आणि एक्स-रे करण्यास सांगितलं. या तपासणीचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्का बसला होता. या व्यक्तीच्या युरिनरी ब्लॅडर अर्थात मूत्राशयाच्या पिशवीत खिळा अडकून बसला होता. हा खिळा सुमारे एक वर्षापासून अडकून बसल्याने त्याला तीव्र वेदना होत होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Social media, Viral, Viral photo