मुंबई, 19 जून : ट्विटर हा लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. अनेक नामवंत व्यक्ती, सेलेब्रिटी, उद्योगपती या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. जगातल्या सर्वांत प्रभावशाली व्यक्तींमध्ये बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचाही समावेश होतो. दलाई लामा हे देखील ट्विटर युजर आहेत. ट्विटरवर त्यांचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत दलाई लामांचा समावेश होतो. दलाई लामांनी ट्विटरचा वापर कसा सुरू केला, यामागची कहाणी रंजक आहे. ट्विटरच्या तत्कालीन सीईओंनी यासाठी पुढाकार घेतला होता. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे भलेही निर्वासिताचं जीवन जगत असले तरी त्यांची गणना जगातल्या सर्वांत प्रभावशाली व्यक्तींमध्ये केली जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ही बाब अगदी स्पष्टपणे दिसते. ट्विटरवर दलाई लामा यांच्या हँडलची गणना जगातल्या सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या हँडल्समध्ये होते. दलाई लामा यांचं @DalaiLama या नावाने ट्विटर हँडल आहे. या हँडलला 18.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेतत. 14व्या दलाई लामांचं कार्यालय हे हँडल चालवतं. ट्विटरवर या हँडलची सुरुवात फेब्रुवारी 2009मध्ये झाली होती. त्या वेळी ट्विटर आजच्याइतकं लोकप्रिय नव्हतं. त्या वेळी जगभरातल्या प्रभावशाली व्यक्तींना या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी एक खास मोहीम चालवली गेली. दलाई लामादेखील या मोहिमेतूनच ट्विटरवर आले. त्यांची ट्विटरवर येण्याची कहाणी रंजक आहे. ट्विटरचे सह-संस्थापक आणि तत्कालीन सीईओ इव्हान विलियम्स आणि जॅक डॉर्सी यांनी एकत्रितपणे मार्च 2006मध्ये ट्विटरचा प्रारंभ केला. जगभरातल्या सेलेब्रिटीजनी त्याचा वापर करावा, अशी त्यांची भूमिका होती. यासाठी ट्विटरने जगभरातल्या नामवंतांना ट्विटरवर आणण्यासाठी मोहीम सुरू केली होती. दलाई लामा यांचं अकाउंट हादेखील या मोहिमेचा एक भाग होता. इवान यांनी ओप्रा विन्फ्रे यांनाही ट्विटरवर आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ट्विटरचे सहसंस्थापक आणि तत्कालीन सीईओ इव्हान विलियम्स यांनी दलाई लामा यांना ट्विटरवर आणण्यामागची कहाणी सांगितली. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, `या संदर्भात मी जेव्हा दलाई लामा यांची भेट घेतली, तेव्हा मला समजलं की धर्मगुरूंना ट्विटरविषयी नीट माहिती देण्यात आलेली नाही. त्यानंतर मी त्यांना ट्विटरविषयी माहिती दिली. त्या वेळी आम्ही त्यांचं ट्विटर अकाउंट तयार केलं आणि अकाउंट हँडल करण्यासाठी त्यांना एक ब्लॅकबेरी फोनदेखील दिला.` `तो आयफोन येण्यापूर्वीचा काळ होता. त्यामुळे आम्ही दलाई लामा यांना ब्लॅकबेरी फोन दिला होता. त्या फोनच्या माध्यमातून त्यांच्या ऑफिसमधल्या व्यक्ती दलाई लामांचं ट्विटर अकाउंट चालवत होत्या. मी आणि माझी पत्नी दीर्घ काळ दलाई लामा यांच्या फोनचं बिल भरत होतो,` असं इव्हान विलियम्स यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.