मुंबई, 1 नोव्हेंबर : पुनर्जन्म ही अंधश्रद्धा आहे असं अनेकांना वाटतं. वरवर पाहता पुनर्जन्माची सत्यता पटेल अशी फारशी उदाहरणं जगात नाहीत, मात्र इंग्लंडच्या हेक्झम शहरात घडलेली एक घटना पुनर्जन्मावर विश्वास बसण्यासाठी पुरेशी आहे. ही घटना 1957मधली आहे. एका कुटुंबातील 2 बहिणींचा अपघातात मृत्यू झाल्यावर त्यात कुटुंबात त्यांचा पुनर्जन्म झाला. लोकांना हे खोटं वाटलं, तरीही मेलेल्या बहिणीच पुन्हा जन्मल्याचे अनेक पुरावेही मिळाले.
इंग्लडच्या हेक्झम शहरात पुनर्जन्माची एक घटना घडली. 5 मे 1957 मध्ये जोआना आणि जॅकलीन या दोघी बहिणी त्यांच्या अँथनी नावाच्या मित्रासोबत चर्चमध्ये जात होत्या. त्यावेळी भरधाव कारनं त्यांना धडक दिली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी जोआना 11 तर, जॅकलीन 6 वर्षांची होती. आई फ्लॉरेन्स आणि वडील जॉन पोलॉक यांना याचा जबरदस्त मानसिक धक्का बसला. आपल्या मुली एक ना एक दिवस परत येतील, अशी आशा त्यांना वाटू लागली. तसं ते बोलूही लागले, पण त्यांच्या बोलण्याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही.
त्या दोन बहिणींच्या मृत्यूनंतर पोलॉक दाम्पत्याला 4 ऑक्टोबर 1958 रोजी जुळ्या मुली झाल्या. त्यांचं नाव जिलियन आणि जेनिफर ठेवण्यात आलं. त्या मुलींच्या शरीरावर विचित्र जन्मखुणा होत्या. एखाद्या अपघातातील व्रणांप्रमाणे त्या खुणा होत्या. जॅकलीनच्या डोक्यावर मार बसल्यामुळे जशी जखम होती, तसाच व्रण जिलियनच्या डोक्यावर होता. कालांतरानं त्यांच्या लक्षात आलं, की जोआना आणि जॅकलीन यांना अपघातावेळी ज्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या, त्याच ठिकाणी त्या जन्मखुणा होत्या.
मुली जशा मोठ्या होऊ लागल्या, तशी त्या दोघींमधील व त्यांच्या मृत बहिणींमधील समानता पालकांना जाणवू लागली. लोकांना हा योगायोग वाटत असला, तरी पालकांना याची सत्यता पटू लागली होती. दरम्यान पोलॉक कुटुंब विटली बे या शहरात स्थलांतरित झालं. मुली 4 वर्षांच्या झाल्यावर पुन्हा हेक्झम शहरात ते राहायला आले. या काळात घडलेल्या आणखी काही गोष्टींमुळे त्यांच्या पुनर्जन्माची खात्री पटू लागली. जिलियन आणि जेनिफर रस्त्यातून चालताना कारला पाहून घाबरायच्या, ओरडायच्या. ती कार आम्हाला चिरडून टाकेल असं म्हणायच्या. जोआना आणि जॅकलीनची खेळणी जेव्हा त्यांना दिली, तेव्हा त्यांनी नावांसकट सर्व काही ओळखलं. वास्तविक आई-वडिलांनी त्यांना त्यांच्या बहिणींविषयी काहीही सांगितलं नव्हतं.
वाचा - शरीराच्या 'या' भागातून घाम येणं धोक्याची घंटा; येऊ शकतो हार्ट अटॅक
जोआना आणि जॅकलीन शिकत असलेल्या शाळेचं नावही जिलियन आणि जेनिफर या दोघींना माहीत होतं. हेक्झम शहरातल्या काही वास्तू व रस्त्यांबद्दलही दोघींना व्यवस्थित माहिती होती. जिलियन आणि जेनिफर खेळताना कारनं धडक दिल्यासारखं करायच्या. त्यांच्या दोघी बहिणींमध्ये आणि त्यांच्यामध्ये अनेक समान गोष्टी आढळू लागल्या होत्या.
सध्या त्या जुळ्या बहिणींचं वय 64 वर्षांचं असून, त्या सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगत आहेत. त्यांच्या आयुष्यातली ही घटना मात्र आश्चर्यचकित करणारी होती. पोलॉक कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या सर्वांना हा पुनर्जन्म असल्याबाबत खात्री पटली होती. काही स्थानिक वृत्तपत्रांनी या घटनेचं वार्तांकनही केलं होतं. ‘द मिरर’मधील एका वृत्तानुसार डॉ. इयान स्टीव्हन्सन या संशोधकानं त्या दोन जुळ्या मुलींच्या केसचा अभ्यास केला व त्याचे निष्कर्ष Rincarnation And Biology या त्यांच्या पुस्तकात नोंदवले आहेत. जिलियन आणि जेनिफर जशाजशा मोठ्या होत गेल्या, तशा त्यांच्या मागच्या जन्माच्या आठवणी पुसल्या गेल्या. त्या दोघी 20 वर्षांच्या असताना डॉ. इयान त्यांना भेटले. त्यावेळी त्या दोघींना मागच्या जन्मातलं काहीही आठवत नव्हतं. मात्र त्यांना कधीकधी कार अपघाताची भयंकर स्वप्न पडतात. पुनर्जन्म खरोखरच असतो का, याबाबत मतमतांतरं आहेत. मात्र, जगात काही घटना अशा घडल्या आहेत, की त्यामुळे पुनर्जन्मावर लोकांचा विश्वास बसेल. त्यापैकीच ही एक घटना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Science