नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : सध्या सुट्यांचा काळ सुरू आहे. अशावेळी अनेक कुटुंब पर्यटनाचा प्लॅन आखतात. कार किंवा खासगी वाहनाने दूरवरचा प्रवास करण्याला प्राधान्य दिलं जातं. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेकदा जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर वाहन थांबवले जाते; पण असं करताना योग्य ती काळजी घ्यावी लागते, अन्यथा वन्य प्राण्यांचा हल्ला होऊन जीव गमावण्याचा धोका अधिक असतो. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात कारजवळ थांबलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला जंगलात ओढून नेल्याचं स्पष्ट दिसत आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेकदा घनदाट जंगलाच्या रस्त्याने जावं लागतं. अशा ठिकाणाहून जाताना बऱ्याचवेळा माकडं, साप, हरिण असे वन्यप्राणी दिसत असतात. त्यांना पाहण्याचा मोह आवरत नाही म्हणून आपण वाहनाच्या खाली उतरतो. पण हिंस्र प्राण्यांचा हल्ला होण्याची शक्यताही नाकारता येत नसते. व्हायरल झालेल्या व्हिडिओतही बेसावध असलेल्या महिलेला वाघाने क्षणाधार्थ ओढून नेल्याचं दिसतं आहे. हा व्हिडिओ बराच जुना असला तरी सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे. हल्ल्याचा हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स हळहळ व्यक्त करत आहेत. व्हायरल व्हिडिओत दिसतं त्याप्रमाणे, जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर दोन-तीन कार उभ्या आहेत. सर्वांत पुढे असणाऱ्या कारमधून एक महिला खाली उतरते आणि त्याचवेळी एक वाघ जंगलातून बाहेर पडतो आणि महिलेवर हल्ला करतो व महिलेला जंगलात ओढून नेतो. ही घटना घडत असताना कारमधील महिलेचे नातेवाईक तिला वाघाच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. पण यात ते अयशस्वी ठरतात असं व्हिडिओत दिसत आहे. हे वाचा - चूक कोणाची? सहा सेकंदांचा Video पाहून उडेल थरकाप इन्स्टाग्रामवर व्हिडिओ केला शेअर वाघाच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर animals_powers नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. केवळ 27 सेकंदाचा हा व्हिडिओ असून, 17 हजारांपेक्षा अधिक लोकांनी याला लाईक केला आहे. तर अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रियाही देत आहेत.
नेटिझन्स म्हणतात, मूर्खपणामुळे गमावला जीव वाघाचा व्हायरल व्हिडिओ पाहून इन्स्टाग्रामवर असंख्य प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यात एका युजरने म्हटलंय की, हा व्हिडिओ चीनमधील आहे. दुसऱ्या एका युजरने मूर्खपणामुळे महिलेला जीव गमवावा लागल्याची भावना व्यक्त केली आहे. जंगलातून जाणारा मार्ग असताना कारच्या खाली उतरण्याची गरजच काय होती? असा प्रश्न अन्य एका युजरने उपस्थित केला. जंगलातील मार्गावरून प्रवास करताना आवश्यक ती काळजी घ्यायला हवी, असं मतही काहीजण व्यक्त करत आहेत.