चीन, 07 जून: जगभर कोविड-19 विषाणू महामारीचा प्रकोप सुरू आहे. तरीही मेडिकलव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतील संशोधकांनी त्यांचं काम सुरूच ठेवलं आहे. त्यामुळे जगासमोर नवनव्या गोष्टी येत आहेत. चीन (China) मध्ये मे महिन्यात डायनासॉरचा अवशेष (Dinosaurs Fossil) सापडला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन पुन्हा चर्चेत आला आहे.
नैऋत्य चीनमध्ये युनान प्रातांत असलेल्या लुफेंग शहराजवळ जीवाश्मशास्रज्ञांना (Palaeontologists) ज्युरॅसिक काळातल्या ल्युफेंगोसोसर प्रकारातील डायनासॉरचा 70 टक्के सांधलेल्या अवस्थेतील सांगाड्याचा अवशेष सापडला आहे. या अवशेषाची लांबी 8 मीटर आहे. मे महिन्याच्या अखेरीस सापडलेला हा अवशेष सुमारे 180 मिलियन वर्षांपूर्वीचा असावा असा शास्रज्ञांचा अंदाज आहे. हा अवशेष सापडलेल्या परिसरातील लाल मातीची प्रचंड धूप होत आहे. त्यामुळे या शहरातील डायनासॉर फॉसिल कॉन्झर्व्हेशन अँड रिसर्च सेंटरने (Dinosaur Fossil Conservation and Research Centre) या अवशेषाची देखरेख करायला सुरुवात केली आहे असं बातमीत म्हटलं आहे.
डायनासॉर फॉसिल कॉन्झर्व्हेशन अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख वँग ताउ म्हणाले, ‘ लुफेंगोसॉरसचा जवळजवळ पूर्ण जीवाश्म सांगाडा सापडणं ही खूपच दुर्मिळ घटना असून हा अवशेष आता चीनचा राष्ट्रीय खजिना ठरला आहे. एवढा मोठा जीवाश्म सापळा सापडणं ही जगाच्या पाठीवर दुर्मिळच गोष्ट आहे. या सापळ्यातील डायनासॉरची शेपटी आणि मांड्यांच्या अवशेषांचा अभ्यास केला तर हा जायंट लुफेंगोसॉरस (Lufengosaurus) असावा आणि तो ज्युरॅसिक काळात इथं राहिला असावा असं वाटतं.’
त्या ठिकाणच्या फोटोमध्ये मजूर लाल मातीखाली लपलेले जीवाश्म ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ करताना दिसत आहेत. ज्युरॅरिस काळाच्या सुरुवातीला इथं असलेला लुफेंगोसॉरस हा मॅसोस्पाँडलिड डायनॉसॉरस (Massospondylid dinosaurs) गटातील आहे.
हेही वाचा- काय सांगता ! फक्त एक आंबा हजार रुपयाला... 'या' आंब्याची सगळीकडे चर्चा
2017 मध्ये लुफेंगोसॉरस अवशेषाच्या बरगडीत जेव्हा शास्रज्ञांना 195 मिलिनय वर्षांपूर्वीचं कोलाजेन प्रोटिन (collagen protein) सापडलं तेव्हा हा या डायनासॉरसचं नाव जगाच्या पटलावर चर्चेला आलं. याचवर्षी जानेवारी महिन्यात चीनमध्ये 120 मिलियन वर्षांपूर्वीचे डायनासॉरचे जीवाश्म संशोधकांना सापडले होते. संशोधकांनी यांचा अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते अवशेष ‘वुलाँग बोहाइनसिस’ किंवा ‘द डान्सिंग ड्रॅगन’ याचे असावेत. पक्षी आणि डायनासॉर यांच्या वैशिष्ट्यांचं मिश्रण या प्राण्यात दिसून आलं होतं.
हा डायनासॉर हाडांची मोठी शेपटी असलेल्या रावेन नावाच्या विशाल डायनासॉरसारखा होता असं चीन आणि अमेरिकेतील संशोधकांचं मत होतं. चीनमध्ये सापडलेल्या या जीवाश्मामुळे चीन पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बातम्यांमध्ये चर्चेत आला आहे. या संशोधनामुळे आपल्याला डायनासॉरच्या काळाबद्दल आणखीही सखोल माहिती मिळू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Photo viral