जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती (Food Culture) असते. तसंच, खाण्या-पिण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. काही ठिकाणच्या नागरिकांना शाकाहारी पदार्थ खाणं जास्त आवडतं, तर काही ठिकाणच्या नागरिकांचा मांसाहारावरच भर असतो. मांसाहार ही संकल्पना सर्वत्र ज्ञात असली, तरी कोणी आहारात किडी (Caterpillars) किंवा अळ्यांचा समावेश करत असल्याचं समजलं, तर अनेकांना धक्का बसतो. काही जणांच्या तर अंगावर शिसारीही येते. असं असलं तरीही, अशा गोष्टींचा आहारात समावेश करणाऱ्या व्यक्ती अनेक देशांत आहेत. काही फूड कंपन्यांनी (Food Companies) तर किड्यांचा आहारात समावेश करण्याच्या दृष्टीने त्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे चटपटीत पदार्थ अर्थात स्नॅक्स तयार करायला सुरुवात केली आहे. वाचून अत्यंत विचित्र किंवा किळसवाणं वाटलं, तरी हे खरं आहे.
दक्षिण आफ्रिकेतल्या एका स्टार्टअप (Start Ups) कंपनीने हिरव्या आणि काळ्या रंगाच्या किड्यांचा वापर करून स्नॅक्स आणि चॉकलेट्सची निर्मिती करायला सुरुवात केली आहे. ज्या व्यक्ती थेट किडे खाऊ शकत नाहीत, पण त्यांना किड्यांचा आहारात समावेश करण्याची इच्छा आहे, अशा व्यक्ती किड्यांपासून बनवलेले स्नॅक्स (Snacks made from Caterpillars) नक्की खाऊ शकतील. अशा उद्देशाने या स्नॅक्सची निर्मिती केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या केमिकल इंजिनीअर वेंडी वेसेला यांनी एक पद्धत विकसित केली आहे. त्याद्वारे या किड्यांचं पीठ तयार केलं जाईल आणि त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स पदार्थ तयार केले जातील.
('ती' गोष्ट करू की नको? द्विधा मनस्थितीत असाल तर राशिभविष्यातून मिळेल उत्तर)
Caterpillars अर्थात अळ्या आपण अनेक झाडांवर पाहतो. वेंडी वेसेला यांनी एक खास तंत्र विकसित केलं असून, त्या तंत्राद्वारे हिरव्या आणि काळ्या रंगाच्या काटेरी अळ्यांपासून पीठ तयार केलं जाणार आहे. त्या पिठापासून बिस्किट्स, प्रोटीन बार्स, चॉकलेट्स, सीरियल्स आणि शेक्स किंवा अगदी स्मूदीही बनवता येऊ शकेल. कॅटरपिलर्सना मोपेन वर्म असंही म्हटलं जातं. या अळ्या खाण्याची पद्धत बदलण्याची वेंडी यांची इच्छा आहे. जोहान्सबर्गमधल्या सँडटन या अपमार्केट भागात एक फूड फेअर आयोजित करण्यात आलं होतं. त्यात वेंडी यांनी हे तंत्र सादर केलं. त्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. एका ग्राहकाने त्यांना सांगितलं, की त्याला किडे खायची इच्छा नाही; मात्र चॉकलेटच्या स्वरूपात ते फारच चविष्ट लागत आहेत.
वेंडी सांगतात, की किडे किंवा अळ्या खाण्याचा विचार जरी मनात आला, तरी बहुतांश जणांना किळस वाटते; मात्र कॅटरपिलर्स हा पोषक तत्त्वांचा अत्यंत उत्तम स्रोत आहे. कॅटरपिलर्समुळे पर्यावरणाचं काही नुकसान होत नाही. तसंच त्यांच्या उत्पादनासाठी स्वतंत्र जमीनही लागत नाही.
वेंडी यांचं हे उत्पादन ऑरगॅनिक अर्थात सेंद्रिय आहे. त्यांच्या या ऑरगॅनिक प्रॉडक्ट्सना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काही ग्राहकही मिळाले आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीत किड्यांपासून बनवलेल्या पदार्थांना हळूहळू थोडं स्थान मिळू लागलं आहे, हे खाद्यपदार्थ स्वीकारले जाऊ लागले आहेत. वेंडी आपल्या या प्रॉडक्टबद्दल खूपच उत्साही आहेत. त्यांच्या मते हे स्नॅक्स पिझ्झा टॉपिंग्जच्या रूपातही वापरणं शक्य आहे. तशा रूपातही त्या प्रॉडक्ट्स सादर करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa