नवी दिल्ली, 26 मे: ज्याच्याशी ऑनलाइन डेटिंग (Online Dating) करत आहोत, त्याने अचानक संपर्क तोडला तर एखादी मुलगी काय करील? परदेशातल्या ज्युलिया नावाच्या एका मुलीच्या बाबतीत असं घडलं, तेव्हा तिने त्याचा खूप शोध घेतला. शेवटी तिला कळलं, की तो तुरुंगात (Jail) आहे, तेव्हा ती तिथपर्यंतही पोहोचली; पण त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर तिला उपरती झाली.
ज्युलियाने टिक-टॉकवर (Tik-Tok) आपला हा विचित्र अनुभव शेअर केला आहे. यासंदर्भातली बातमी ladbible.com ने दिली आहे.
'ऑनलाइन डेटिंग करत असलेल्या व्यक्तीने तुमच्याशी संपर्क तोडला, तर तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकाल? मी किती काय काय केलं होतं ते सांगते,' असं म्हणून ज्युलियाने आपला अनुभव शेअर केला आहे.
'मी हायस्कूलमध्ये (Highschool) होते, तेव्हा माझी या मुलाशी ऑनलाइन भेट झाली. तीन महिने आमचा एकमेकांशी संवाद सुरू होता. आणि एके दिवशी अचानक तो गायबच झाला. म्हणजे त्याच्याकडून कशालाच प्रतिसाद नाही. आणि मी अस्वस्थ झाले. अखेर मी त्याच्या सगळ्या मित्रांना मेसेज केला आणि तो कुठे आहे, याची चौकशी केली; पण तो कुठे आहे, याची कोणालाच माहिती नव्हती. त्यांच्याशीही त्याचा बऱ्याच दिवसांत संपर्क झाला नव्हता, असं समजलं,' असं ज्युलियाने सांगितलं.
नंतर ज्युलियाला अचानक असं वाटलं, की कदाचित तुरुंगात तर गेला नसेल? नेमकी तिची शंका खरी ठरली. तो तुरुंगातच असल्याचा छडा तिला लागला; पण काहीही झालं, तरी त्याला भेटून शोधून काढायचंच, असं तिच्या मनाने घेतलं होतं. म्हणून ती त्याला भेटण्याचे मार्ग शोधत होती. तो मार्गही तिला सापडला.
तिने तिच्या शाळेच्या लॉ सोसायटीमध्ये (Law Society) सहभागी होण्याचा निर्णय घेतला. कारण या लॉ सोसायटीतर्फे स्थानिक काउंटीतल्या जेलमध्ये अभ्यास सहल जाणार होती. त्या सहलीत सहभागी होता यावं, म्हणून तिने त्या सोसायटीच्या आधीच्या सगळे कार्यक्रमांनाही उपस्थिती दर्शविली. एका फॉलो-अप व्हिडिओमध्ये ज्युलियाने पुढचा घटनाक्रम उलगडला आहे. अनेक नेटिझन्सनीही पुढे काय घडलं, याबद्दल तिला विचारलं होतं.
'अखेर आम्ही एके दिवशी तुरुंगात जायला तयार झालो. तिथे आम्हाला कैद्यांना भेटता येणार होतं आणि मी माझ्याशी डेटिंग करणाऱ्याला शोधून काढू शकेन, असा विश्वास मला वाटत होता; पण तिथे गेल्यावर शिक्षकांनी मुला-मुलींचे वेगवेगळे गट केले. मुलांना पुरुष कैद्यांच्या भेटीला, तर मुलींना महिला कैद्यांच्या भेटीला नेण्यात आलं. मला पुरुष कैद्यांच्या विभागात जायचं होतं. तसा हट्टही मी माझ्या शिक्षिकेकडे धरला; मात्र त्यांनी परवानगी दिली नाही. प्रौढ वयाच्या कैद्यांनी तरुण मुलींकडे वाईट नजरेने पाहू नये, यासाठी त्यांनी तशी परवानगी दिली नाही. त्यामुळे मी त्याला भेटणं तर सोडाच; पण पाहूही शकले नाही,' असं ज्युलियाने सांगितलं.
'यातून मला धडा काय मिळाला? तर, पुरुषाचा पाठलाग करू नका? आणि खासकरून जेव्हा तुम्ही हायस्कूलमध्ये असता आणि तो जेलमध्ये असतो आणि तो तुमच्यासाठी चांगला नाही, हे तुम्हाला माहिती असतं, तेव्हा....' अशा शब्दांत ज्युलियाने आपली गोष्ट संपवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral