मुंबई, 2 सप्टेंबर- बस, रेल्वेचा प्रवास असो की, विमान प्रवास या प्रत्येक ठिकाणीच सहप्रवाशाच्या चुकीच्या वागण्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यावेळी दोघांमध्ये वादही उद्भवतात. परंतु, वैमानिकाला प्रवाशांची एखादी बाब खटकली तर तो विमान रद्द करण्याची तंबीही देऊ शकतो. नुकताच हा प्रकार अमेरिकेत साऊथवेस्ट एअरलाइन्सच्या पायलटसोबत घडला. एअरड्रॉपच्या माध्यमातून काही प्रवाशांनी पायलटला अश्लील फोटो पाठवले. याचा राग आल्याने पायलटने उड्डाण रद्द करण्यासह प्रवाशांना फ्लाइटच्या खाली उतरवण्याची धमकीच देऊन टाकली. इंटरकॉमवर इशारा देताना पायलटच्या आवाजाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिनेटच्या एका रिपोर्टनुसार, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ह्युस्टनचं विल्यम पी. विमानतळ ते मॅक्सिकोचं काबो सान लुकासचं विमानतळ यादरम्यानच्या उड्डाणावेळी काही प्रवाशांनी पायलटला अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली. तेव्हा पायलटने इंटरकॉमवर असं न करण्याचा इशारा दिला. अश्लील फोटो पाठवणं थांबवलं नाही तर मॅक्सिकोला जाणारं फ्लाईट थांबवण्यात येईल, अशी तंबीच त्याने देऊन टाकली. या संदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यात इंटरकॉमवर पायलट प्रवाशांना तंबी देताना ऐकू येत आहे. पायलट म्हणतो की, ‘जर प्रवाशांनी (अश्लील) फोटो पाठवणं थांबवलं नाही तर विमान लँड करावं लागेल. आम्हाला सुरक्षा व्यवस्थेला पाचारण करणं भाग पडेल. असं केल्याने तुमच्या सुट्यांचा खोळंबा होऊ शकतो, असं म्हणतानाही पायलटचा आवाज या व्हिडिओत येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअरलाइन्सकडून स्पष्टीकरण आलंय. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला टीमकडून सर्वोच्च प्राधान्य असल्याचं एअरलाइन्सकडून सांगण्यात आलंय. व्हायरल झालेल्या व्हिडिओची सतत्या पडताळता येत नसल्याचं एअरलाइन्सच्या वतीनं सांगण्यात आलंय. रिपोर्टनुसार, मागील काही दिवसांपूर्वी इतर एअरलाइन्समध्येही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. या आधीही प्रवासादरम्यान प्रवाशांनी एअरड्रॉपच्या माध्यमातून पायलटला मेसेज व फोटो पाठवले होते. त्यामुळे पायलटला त्रास सहन करावा लागला होता.
Southwest Airlines pilot threatens to turn plane around if passengers don’t stop airdropping him nudes pic.twitter.com/VTnOHLhYkz
— No Jumper (@nojumper) August 30, 2022
(हे वाचा: चमत्कार! कार रेसिंगमध्ये अचानक हवेत उडू लागला माणूस; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO )
असा व्हायरल झाला व्हिडिओ दरम्यान, एअरड्रॉपच्या माध्यमातून आयफोन युजर्स सेल्युलर डाटा किंवा वाय-फायचा वापर न करता अॅपल युजर्सना डिजिटल फाइल पाठवू शकतात. साऊथवेस्ट एअरलाइन्समध्येही असाच प्रकार घडला. पायलट इशारा देत असताना एका प्रवाशाने याचा व्हिडिओ तयार केला आणि तो टिकटॉकवर शेअर केला. त्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओला आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. ट्विटवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, यावर अनेक युजर्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, भारतातही पायलट व केबिन क्रूच्या कर्मचाऱ्यांशी राजकारणी व प्रवाशांचा वाद झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.