सर्वसाधारणपणे पृथ्वी गोल आहे, किंवा सफरचंदासारखी आहे असं आपण ऐकतो. पृथ्वीच्या अंतरंगात असलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीला एक आकार प्राप्त झाला होता. आता गुरुत्वाकर्षणामुळेच हा आकार बदलू लागलेला आहे. पृथ्वीचा आकार आता पहिल्यासारखा राहिलेला नसल्याचं एका नव्या अभ्यासात समोर आलंय. पृथ्वीच्या जन्माबाबत अनेक रहस्य आहेत. इतक्या साऱ्या विविधतेने नटलेली ही पृथ्वी गुरुत्वाकर्षणामुळे तयार झाली, असं अनेक अभ्यासांमधून आजवर सिद्ध झालंय.
वातावरणातील गोष्टींना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणानं खेचून घेतलं. त्यातूनच एक गोळा तयार झाला. काही ठिकाणी उंच, काही भागात सखल अशा पद्धतीनं त्या गोळ्याचा पृष्ठभाग होता. या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वीवरील सर्व जीवन सुरळीत सुरु आहे. आता याच गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा आकार बदलतो आहे, असं एका अभ्यासात समोर आलंय. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर बदल होत आहेत. सध्या त्याचं केंद्र भारताच्या खाली भूगर्भात आहे.
पृथ्वीवर अनेक बदल
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर अनेक बदल घडत आहेत, असं नेचर कम्युनिकेशन्समधील एका अभ्यासात समोर आलंय. हे बदल सतत होत आहेत. मात्र ते हळूहळू होत आहेत. त्यामुळे आपल्याला काही लक्षात येत नाही. एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आल्यास अशा गोष्टी ध्यानात येतात.
गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये अनेक बदल होत आहेत. पर्वतीय प्रदेश कमी होऊ लागले आहेत. भूगर्भात जवळपास 24 किलोमीटर आतपर्यंत घुसलेले मोठाले खडक बाहेर येऊ लागले आहेत. यामुळे जे खडकांचे आकार तयार होत आहे, त्याला मेटामॉर्फिक कोअर कॉम्प्लेक्सेस असं म्हणतात. याची प्रक्रिया हे अजूनही न उलगडलेलं कोडं आहे.
शास्त्रज्ञांचं सखोल संशोधन सुरु
या रहस्याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अमेरिकेतील फिनिक्स आणि लास वेगास या दोन मेटामॉर्फिक कॉम्प्लेक्सेसची निवड केली. हे दोन्ही प्रदेश त्याठिकाणी असलेली प्राचीन पर्वतांची रांग नामशेष झाली आहे. मेटामॉर्फिक कॉम्प्लेक्सेसमध्ये अशा प्रकारचे मोठमोठे पाषाण तयार होतात, मात्र ते मुळापासून उखडलेही जाऊ शकतात. त्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवू शकते. पृथ्वीच्या वरील पृष्ठभागापासून त्याच्या आतली मुळं तुटली, तर ते हानीकारक ठरू शकतं. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमिनीचा पातळ थर पर्वतरागांच्या खाली मात्र जाड होतो. पृथ्वीच्या आतील भागातील प्रावरणाची जागा तो घेतो. यामुळे उष्णता बाहेर पडते. द्रव पदार्थाची हालचाल होते. दगड वितळू लागतात. यामुळे पर्वतांची मुळं नष्ट होऊ लागतात. पर्यायानं पर्वतरांगा नष्ट होतात.
फिनिक्स आणि लास वेगास शहरं अशा मेटामॉर्फिक कॉम्प्लेक्सेसवर तयार झाली आहेत. अशा ठिकाणांना भूकंपाचा धोका असतो. पृथ्वीच्या आतील गुरुत्वाकर्षणाची शक्ती आणि बाहेरच्या वातावरणातील बदल यामुळे हे घडू शकतं. पृथ्वीवरील सजीवांचं तसंच पृथ्वीच्या अंतरंगातील जीवाष्मांचं यामुळे नुकसान होऊ शकतं.
एकंदरीतच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर व तिच्या अंतरंगात अनेक बदल होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीचा आकारही बदलतो आहे. ही प्रक्रिया धीम्या गतीनं होत असल्यानं ते चटकन लक्षात येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earth