प्रमोद पाटील, मुंबई , 29 मार्च: स्वप्नांना, जिद्दीला आणि निर्धाराला खरंच वय नसतं. हे फक्त सहा वर्षांच्या चिमुकलीला बघून कळतं. साईशा राऊत या नवी मुंबईतल्या या सहा वर्षांच्या चिमुकलीने माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मिशन पूर्ण करण्याची किमया केलीय. ज्या वयात लहान मूलं वेगवेगळे खेळ खेळत असतात त्याच वयात साईशाने एवरेस्ट चढण्याचा निर्धार केला. आणि तो पूर्णही केला. साईशा राऊत या सहा वर्षाच्या मुलीचे चक्क वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्यासाठी साईशाने प्रचंड मेहनत घेतली. रोज 14 किलोमीटर सायकलिंग 12 किलोमीटर वॉकिंग. शिवाय 1 तास स्विमिंग आणि योगा. अशी दिनचर्या ती फॉलो करायची. ही सगळी तयारी ते तिने केलेला हा रेकॉर्ड यात निरंतर तिच्या सोबत होते वडिल मंगेश राऊत.
साईशाने सर केलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर एवढी आहे. तर एव्हरेस्टचा बेस कॅम्प आहे 5300 मीटरवर. मायनस 10 ते 20 टेम्परेचरमध्ये नेपाळच्या लुक्लातून 22 किलोमीटरचा ट्रेक करुन बेस कँपपर्यंत पोहोचण्याची कामगिरी साईशानं फत्ते केली. “वाट बघ, आज इथवर आलेय, पुढे तुला पूर्ण सर करेल” असं एव्हरेस्टला ठणकाऊन सांगणाऱ्या साईशाने आता एवढ्यावर न थांबता रशियातलं सर्वांत उंच शिखर माउंट एलब्रस सर करण्याचा निर्धार केलाय. आणि तिचा निर्धार किती पक्काय याची साक्ष खुद्द माउंट एव्हरेस्ट देतोय.
दरम्यान, नवी मुंबईच्या अवघ्या सहा वर्षांच्या साईशा राऊतनं खेळण्या बागडण्याच्या वयात चक्क एव्हरेस्टचा बेस कँप गाठलाय. साईशावर सध्या कौतुकाची थाप पडत आहे. तिचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.