वॉशिंग्टन, 2 नोव्हेंबर : अमेरिकेतील वेस्ट वर्जीनिया येथे राहणाऱ्या रुपा हुलेट यांनी गिनिज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. फिटनेस ट्रेनर असणाऱ्या रुपा यांनी एका मिनिटात 34 पुलअप्स करुन हा गिनिज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. रुपा यांचा पुलअप्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मार्चमध्ये लॉकडाउनपूर्वी आपल्या पतीसोबत रुपा टाईमपास म्हणून अनेक फिटनेस चॅलेन्ज घेत होत्या. त्यानंतर मात्र, त्यांनी रेकॉर्ड्सच्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली.
रुपा यांनी सांगितलं की, ‘लॉकडाउनमध्ये अनेक पुलअप्स केले. हळू-हळू स्पीड वाढत गेला. रोज 100 पुलअप्स करू लागले. यामुळे फिटनेसमध्ये चांगली सुधारणा होत स्टॅमिना वाढला. त्यानंतर, आपल्या मेहनतीने कोणता वर्ल्ड रेकॉर्ड केला जाऊ शकतो, याची माहिती घेतली. याच वेळात वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये पुलअप्सचे रेकॉर्ड्स शोधून काढले. त्यानंतर पुलअप्समध्येच आणखी मेहनत घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं ठरवलं.’ ‘मी रोज 100 पुलअप्स करत असताना जाणवलं की, मी कोणत्या-ना कोणत्या रेकॉर्डच्या आसपास असेन. त्यामुळे फिटनेस रेकॉर्डबाबत माहिती मिळवण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी मला एक मिनिट पुलअप्स रेकॉर्डबाबत समजलं. त्यानंतर यासाठीची तयारी करण्यास सुरुवात केल्याचं,’ रुपा यांनी सांगितलं.
रुपा फिटनेस ट्रेनर आणि प्रोफेशनल कोडर आहेत. रुपा यांना फिटनेसबाबत विशेष आवड नव्हती, परंतु एका ट्रेनरकडून वर्कआउट ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली आणि वजन कमी झालं. त्यानंतर त्यांची फिटनेसमध्ये आवड निर्माण झाली. 45व्या वर्षात हा वर्ल्ड रेकॉर्ड करून रुपाने त्या अतिशय खूश असल्याचं सांगितलं आहे.