मुंबई, 22 नोव्हेंबर : सध्याच्या काळात हॉटेलमध्ये जेवणं, स्ट्रीट फूड खाणं अनेकांना खूप आवडतं. काही जण अशा ठिकाणांची माहिती देणारे फूड ब्लॉगही चालवतात. इंटरनेटवर विविध खाद्यसंस्कृतींची आणि नवनवीन पदार्थांविषयी माहिती आपल्याला मिळते. मित्रपरिवारासोबत, घरातल्यांसोबत सेलिब्रेशन करायचं म्हटलं, की हॉटेलमध्ये किंवा एखाद्या उत्तम फूड जॉइंटवर जाणं पसंत केलं जातं. पूर्वी सेलिब्रेशनची ही संकल्पना आताइतकी दृढ नव्हती. तरीही काही पदार्थ तेव्हाही आणि आजही अनेकांना भुरळ घालताना दिसतात. नुकताच सोशल मीडियावर एका जुन्या रेस्टॉरंटच्या बिलाचा फोटो व्हायरल झाला आहे. हे बिल 1985 सालातलं आहे. 37 वर्षांपूर्वीचं हे बिल नेटकर्यांचं लक्ष वेधून घेतंय, ते त्यातल्या पदार्थांच्या किंमतीमुळे.
हॉटेल व्यवसाय नेहमीच तेजीत असतो. कारण, दिवसेंदिवस खवय्यांची संख्या वाढतेच आहे. तसंच इंटरनेटमुळे हल्ली देशोदेशीच्या रेसिपीज सहज उपलब्ध होतात. यामुळेही अनेकांना नवीन पदार्थ ट्राय करायला फार आवडतात. चांगले पदार्थ खाण्यासाठी खवय्ये कितीही किंमत मोजायला तयार असतात. व्हायरल झालेलं बिल हे त्यातल्या पदार्थांच्या किमतींमुळे चर्चेचा विषय बनलं आहे.
आजच्या तुलनेत किमती अगदीच कमी
व्हायरल झालेल्या फोटोत दिसणार्या पदार्थांच्या किमती या आजच्या तुलनेत अगदीच माफक आहेत. या बिलात शाही पनीरची किंमत 8 रुपये असल्याचं दिसतंय. आज मात्र याच शाही पनीरची किंमत ही 200-550 रुपयांदरम्यान आहे. प्रत्येक हॉटेलगणिक पदार्थांची किंमत बदलते. त्यामुळे इथे सरासरी किमतीचा विचार केला आहे. परंतु, हॉटेलमधल्या पदार्थांच्या किमती दिवसागणिक वाढतच जातात. 1985 सालीही सर्व्हिस चार्ज आकारला जात असे हेही त्या बिलावरून दिसतं आहे.
संपूर्ण बिलावर आकारलाय सर्व्हिस चार्ज
सोशल मीडियावर शेअर झालेल्या या बिलाकडे निरखून पाहिलं, तर असं लक्षात येईल की, या बिलावर सर्व्हिस चार्जही आकारण्यात आला आहे. एकूण बिल 26 रुपये आणि 30 पैसे इतकं असून, त्यात 2 रुपये सर्व्हिस चार्जचा समावेश आहे. याचाच अर्थ हे एका चांगल्या रेस्टॉरंटचं बिल आहे. हा फोटो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांकडून त्या काळी अन्य पदार्थांच्या किमती किती असतील याचाही अंदाज वर्तवला जात आहे.
1985 साली होती इतकी किंमत
नेटकर्यांचं लक्ष वेधून घेणारं हे बिल पिवळ्या रंगाचं असून, 1985 सालातलं आहे. या बिलात शाही पनीर, दाल मखनी, रायतं आणि रोटी या पदार्थांचं आहे. बिल लक्षपूर्वक पाहिल्यास कळेल, की तेव्हा शाही पनीर केवळ 8 रुपयांत, रायतं आणि दाल मखनी हे पदार्थ 5 रुपयांत मिळायचे. तसंच एका रोटीची किंमत ही तेव्हा केवळ 70 पैसे होती.
मार्केटमधली आजची महागाई पाहता तेव्हाच्या या किमती पाहून नक्कीच धक्का बसतो. कारण, सध्या चांगल्या रेस्टॉरंटचं बिल डोळे पांढरे करणारंच असतं. यामुळेच सोशल मीडियावर या बिलाची जोरदार चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.