मुंबई, 3 जानेवारी : कोरोना काळात मोठ्या प्रमाणात आत्महत्याच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. मानसिक आजारातून किंवा नैराश्यातूनही अनेक आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली होती. त्यातच आज नवी मुंबईतील वाशी या भागातून एक महिला आत्महत्येचा प्रयत्न करीत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला इमारतीच्या टॅरेसवर उभी असून उडी मारण्याच्या तयारीत होती.
सुदैवाने याबाबत माहिती मिळताच फायरब्रिगेड आणि पोलीस कर्मचारी योग्य वेळेत घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला आहे. यावेळी महिला इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होती. याशिवाय ती कोणालाही आपल्या जवळ येण्यास विरोध करीत होती. मात्र फायरब्रिगेड आणि पोलीस कर्मचारी महिलेची समजूत काढत होते. यातून महिलेचा जीव वाचला आहे. या महिलेचं नाव सोनल त्रिवेदी असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार महिला मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहे. (Police help a woman who attempted suicide)
मुंबईत इमारतीवरुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव वाचविण्यात पोलीस आणि फायरब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना यश आलं. pic.twitter.com/dZEqmPisEl
— News18Lokmat (@News18lokmat) January 3, 2021
मानसिक आजारातून अनेक वेळा आत्महत्येसारखं पाऊल उचललं जात असल्याचं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे वेळीत मानसिक आजारावर उपचार करणं आवश्यक आहे. तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारची समस्या असलेल्यांना साथ दिली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला तर ते यातून बाहेर पडू शकतात. प्रामुख्याने या मानसिक आजाराबाबत जागृती असणं गरजेचं आहे. अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर मानसिक आजारावर खूप मोठी चर्चा सुरू झाली आहे. नैराश्य वा मानसिक आजारातून होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी अशा लोकांच्या मागे उभे राहून त्यांना आधार देण्याची गरज आहे. या प्रकरणात पोलीस व फायरब्रिगेड वेळेत घटनास्थळी दाखल झाल्यामुळे या महिलेचा जीव वाचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra police, Sucide attempt