मुंबई 15 ऑक्टोबर : आपण अनेकदा हॉटेल, रस्त्यावरच्या स्टॉल्सवर चमचमीत खातो. पण हे पदार्थ तयार करताना योग्य ती स्वच्छता राखली जात नाही. आपणही या गोष्टींबाबत जागरूकता दाखवत नाही. अस्वच्छ ठिकाणी पदार्थ खाल्ल्याने तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात. नुकतंच विमान प्रवासात दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ सापडल्याची घटना समोर आलीय. जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती. विमानप्रवास म्हटलं की सगळ्यांना आरामशीर आणि सुखावणारा प्रवास असंच वाटतं. हे खरं देखील आहे. पण काहीवेळा हा अनुभव चांगलाच अंगाशी येतो. विस्तारा एअरलाइन्सने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या बाबतीत ही धक्कादायक घटना घडली. या प्रवाशाने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ही माहिती दिली. निकुल सोळंकी असं या प्रवाशाचं नाव आहे. निकुल हे विस्तारा एअरलाइन्सने प्रवास करत होते. त्यांनी ट्विट केलंय, ‘एअर विस्तारामध्ये दिलेल्या जेवणात मेलेलं छोटं झुरळं सापडलं.’ यावर इतर नेटिझन्सच्या ही विविध प्रतिक्रिया आल्या. हे ट्विट काही मिनिटांत व्हायरल झालं. विस्तारा एअरलाइन्सने याची दखल घेतली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलंय, ‘हॅलो निकुल, आमच्यातर्फे दिलं जाणारं जेवण हे चांगल्या प्रतीचंच असतं. त्याचा योग्य तो दर्जादेखील आमच्याकडून नेहमीच राखला जातो. कृपया आपण मेसेजद्वारे आम्हाला आपल्या विमान प्रवासाचे तिकीट आणि माहिती पाठवा. आम्ही याची योग्य ती तपासणी करू आणि लवकरातलवकर उत्तर पाठवू. थँक यू.’ एअरलाइन्सने दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रवासी निकुल यांनी आपलं तिकीट शेअर केलं. ज्यावर त्यांची माहितीही दिली आहे. एअरलाइन्स कंपनीने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच या प्रकरणाची नीट चौकशी होईल अशी हमी दिली आहे. जेवणात सापडलेल्या झुरळाचा फोटो व्हायरल
Small cockroach in air Vistara meal pic.twitter.com/ebrIyszhvV
— NIKUL SOLANKI (@manikul008) October 14, 2022
सोशल मीडियावर या प्रकारावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. प्रवासी निकुलने हा फोटो पर्सनल अकाउंटवरुन शेअर केलाय. हा फोटो चांगलाच व्हायरल झालाय. निकुलने दोन फोटो ट्विट केलेत. एकात इडली सांबर, उपमा आहे. दुसऱ्या फोटोत एक मेलेलं झुरळ दिसतंय. यावर प्रतिक्रिया देताना एकाने म्हटलंय, ‘फ्लाईटमध्ये खराब जेवण मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही.’ तर दुसऱ्याने म्हटलंय की, ‘एअरलाइनमध्ये अशी घटना घडणं चुकीचं आहे. तिथे आम्हाला चांगलं जेवण मिळेल अशी आशा असते.’ विमान प्रवासाचं शुल्क खूप असतं.अशावेळेस लोकांना उत्तम सोयी सुविधांची अपेक्षा असते; पण अशा प्रकारच्या घटनांचा लोकांच्या तब्येतीवर आणि एअरलाइन कंपनीच्या प्रतिमेवर ही वाईट परिणाम होईल यात शंका नाही.