मुंबई, 08 जुलै: सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ट्रीकी फोटोज्, रिडल्स, ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रम असलेले फोटोज किंवा चित्रं व्हायरल होतात. असे गोंधळात टाकणारे रिडल्स आणि लॉजिकल रिझनिंगशी संबंधित प्रश्न सोडवायला अनेकांना आवडतात. या ठिकाणी असंच एक ऑप्टिकल इल्युजन निर्माण करणारा फोटो देण्यात आला आहे. या फोटोमध्ये एकूण चार मांजरं दडलेली आहेत. त्यापैकी तीन मांजरं सहज नजरेस पडत आहेत, तर एक मांजर मात्र सहजासहजी दिसत नाही. हे चौथं मांजर शोधून काढण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे. तुमच्याकडे तीक्ष्ण दृष्टी आणि अपवादात्मक निरीक्षणकौशल्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी फोटोमध्ये दडलेलं मांजर चार सेकंदात शोधून दाखवायचं आहे. ‘दैनिक जागरण जोश’नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आपला मेंदू कसं कार्य करू शकतो, याबद्दल ऑप्टिकल इल्युजन्स काही आकर्षक गोष्टी आपल्या समोर मांडतात. रंग, प्रकाश आणि पॅटर्न्स यांची विशिष्ट रचना आपल्या मेंदूची फसवणूक करू शकते, हे सिद्ध झालं आहे. ऑप्टिकल इल्युजनचे भौतिक, शारीरिक आणि संज्ञानात्मक यांसारखे अनेक प्रकार पडतात. हे घटक मनोविश्लेषण क्षेत्राचा एक भाग आहेत. कारण, त्यातून आपल्याला गोष्टींचं आकलन कसं होतं यावर थोडा प्रकाश टाकता येतो. या ठिकाणी दिलेल्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये पहिल्या दृष्टिक्षेपात तुम्हाला तीन काळी मांजरं दिसतील. चौथ्या मांजराचा रंग काळा नाही. त्यामुळे ते लगेच दिसणं कठीण होतं आहे. तुम्हाला चार सेकंदामध्ये चौथं मांजर सापडलं असेल, तर तुमची नजर घारीप्रमाणे तीक्ष्ण आहे. ज्यांना चौथं मांजर सापडलं नाही, त्यांनी फोटोत दिसणाऱ्या सर्वांत शेवटच्या काळ्या मांजराच्या बाजूला (डावीकडे) काळजीपूर्वक निरीक्षण करावं. तिथे राखाडी रंगाचं एक लहान मांजर बसलेलं दिसेल. खरं तर अशी ऑप्टिकल इल्युजन्स लहान मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी वापरली जातात. कारण, कठीण कोडी सोडवण्यासाठी मेंदूचा जितका जास्त वापर केला जातो, तितकी हुशारी वाढायला मदत होते; मात्र सोशल मीडियामुळे सध्या लहान मुलांसोबतच मोठ्यांदेखील या ऑप्टिकल इल्युजन्सच्या मदतीनं चांगलं मनोरंजन होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.