मुंबई, 12 जून : आजकालच्या मुलांचा कल प्रामुख्याने ऑनलाइन गेम्सकडे अधिक आहे. ऑनलाइन गेम्स हे आता मनोरंजनाचे साधन न राहता त्याची मुलांना व्यसन लागत असल्याचं दिसून येतंय. यातूनच अनेक गैरप्रकार घडल्याचंदेखील समोर येत आहे. ऑनलाइन गेम्समुळे मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होतो, असं तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. पण मुलांचा कल या गेम्सकडे वाढत आहे. ऑनलाइन गेम्समुळे एका कुटुंबाचं मोठे आर्थिक नुकसान झालं आहे. चीनमधील एका कुटुंबाला मुलीच्या ऑनलाइन गेमच्या नादापायी सुमारे 52 लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला. हा प्रकार नेमका कसा घडला ते सविस्तर जाणून घेऊया. कोणत्याही गोष्टीचं व्यसन हे वाईट असतं आणि असंच काहीसं एका कुटुंबासोबत घडलं. मुलीच्या ऑनलाइन गेम खेळण्याच्या सवयीमुळे कुटुबांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मॅकगिल युनिव्हर्सिटीने 2022 मध्ये एक विश्लेषण केले होते. त्यानुसार चीनमध्ये स्मार्टफोनचे व्यसन जडलेल्यांची संख्या मोठी आहे. या यादीत सौदी अरेबिया दुसऱ्या तर मलेशिया तिसऱ्या स्थानावर आहे. स्मार्टफोन आणि ऑनलाइन गेम्सच्या सवयीमुळे काय तोटा होऊ शकते हे चीनमधील घटनेवरून दिसून येते. चीनमधील एका 13 वर्षांच्या मुलीला ऑनलाइन गेम्स खेळण्याचं व्यसन जडलं. यामुळे तिच्या कुटुंबाला 449,500 युआन म्हणजेच सुमारे 52,19, 809 रुपयांचा फटका सहन करावा लागला. आता या मुलीच्या आईच्या बँक अकाउंटमध्ये केवळ पाच रुपये शिल्लक आहेत. या मुलीने तिच्या आईच्या डेबिट कार्डचा वापर ऑनलाइन टूल, गेम्स आणि इन-गेम वस्तू खरेदी करण्यासाठी केला. या मुलीच्या शिक्षिकेला तिचा संशय आला आणि या प्रकरणाचा खुलासा झाला. ही मुलगी ऑनलाइन गेम्सच्या आहारी गेली आहे, असं तिच्या शिक्षिकेला जाणवलं. या मुलीचा शाळेतही फोन स्क्रिन वापर जास्त होता, असं तिच्या शिक्षिकेनं सांगितले. वृत्तानुसार, याबाबत माहिती मिळताच मुलीच्या आईने तिच्या बँकेच्या अकाउंटचे डिटेल्स तपासले. तेव्हा आपल्या खात्यावर केवळ पाच रुपये शिल्लक असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. वडिलांनी चौकशी करताच मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. ती म्हणाली की , ``मी गेम्स, इन-गेम खरेदी आणि माझ्या दहा वर्गमित्रांसाठी ऑनलाइन गेम खरेदी करण्याकरिता सर्व पैसे खर्च केले. यासाठी मी एक लाख युआन म्हणजेच 11,61,590 रुपये खर्च केले.`` ``मला घरात एक डेबिट कार्ड सापडलं. मी ते माझ्या स्मार्टफोनशी कनेक्ट केलं. आपत्कालीन स्थितीत अडचण येऊ नये म्हणून आईने मला या कार्डचा पासवर्ड सांगून ठेवला होता, असं या मुलीने सांगितले.`` ही गोष्ट पालकांना माहिती होऊ नये म्हणून तिने ऑनलाइन खरेदीशी संबंधित सर्व ट्रान्झॅक्शन डिटेल्स डिलीट केले होते. मात्र अखेरीस हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणामुळे या मुलीच्या पालकांना जबर धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.