नवी दिल्ली, 30 डिसेंबर : सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सिंह हा मांजर कुळातील एकमेव सोशल प्राणी आहे. ते कळप करून राहतात. या कळपांना प्राईड असं म्हटलं जातं. एका प्राईडमध्ये सुमारे 10 ते 15 सिंह असतात. ज्यापैकी काही प्रौढ नर आणि मादी असतात तर काही शावकं (पिल्लं) असतात. सिंह दिसण्यात अतिशय रुबाबदार असतात. मानेवरील आयाळीमुळे तर ते अधिक आकर्षक वाटतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका सिंहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आपल्या सिल्की आयाळीमुळे या सिंहानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘एनडीटीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गॅब्रिएल कॉर्नो नावाच्या व्यक्तीनं आपल्या ट्विटर अकाउंटवर हा सिंहाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. विविध प्राण्यांचे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी गॅब्रिएल कॉर्नो ओळखला जातो. त्यानं आता पोस्ट केलेला सिंहाचा व्हिडिओ हा पूर्व आफ्रिकेतील केनिया देशातील आहे. केनियातील मसाई मारा हे जगप्रसिद्ध अभायारण्य आहे. गॅब्रिएलनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, झुपकेदार आणि सिल्की आयाळ असलेला एक सिंह दिसत आहे. हा सिंह सूर्यप्रकाशात निवांतपणे बसून आजूबाजूचा परिसर न्याहाळताना दिसत आहे. वाऱ्यावर त्याची सिल्की आयाळ उडताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघताना अनेकांना असं वाटत आहे की, ते एखादी मुलगीच बघत आहेत, जिचे सिल्की केस वाऱ्यामुळे उडत आहेत.
सोशल मीडिया युजर्सला हा ‘कुल’ सिंह आवडला आहे. या व्हिडिओला सात दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि 72 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सिंहाच्या आयाळीमुळे काही युजर्समध्ये वादविवाद देखील झाला आहे. काही युजर्सनी ‘बॅड हेअर डे’ कॅप्शन देऊन हा व्हिडिओ रिपोस्ट केला आहे. अनेकांनी मनोरंजक आणि क्रिएटिव्ह कमेंट्सही केल्या आहेत. सोशल मीडियावरील कमेंट्समुळे पोस्ट पाहण्यात नवी रंगत येते. “आपण आशा आणि प्रार्थना करूया की हा अवाढव्य प्राण्याची शिकार होऊ नये. तुम्ही सहमत असाल तर रिट्विट करा,” अशी कमेंट एका युजरनं केली आहे. तर आणखी एका युजरनं म्हटलं आहे, ‘हे हिंस्ररूपही देखणं आहे, चेहऱ्यावर मेक-अप नाही, आयाळीतील केसांना शॅम्पू , कंडिशनर्स नाहीत, तरीही तो प्रचंड सुंदर दिसतोय.’ “या क्लिपला बॅकग्राउंड म्युझिक असतं तर ती आणखी लक्षवेधक ठरली असती. किती भव्य प्राणी आहे!” असं एका युजरनं म्हटलं आहे.