मुंबई 5 डिसेंबर : पृथ्वीवरील बहुतांश माणसाना मृत्युचं भय कायम सतावत असतं. मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे जरी माणूस मान्य करत असला तरीही ते स्वीकारण्यास मात्र तो कधीच तयार नसतो. अपघातात, आजाराने किंवा घरी बसल्याबसल्या मृत्यू येईल का असं त्याला वाटत असतं. हे सागण्याचं कारण असं की, उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एक असं गाव आहे, जिथे एक मृत्यू झाल्यानंतर 24 तासांत दुसरा मृत्यू होतो. तसंच तिसरा मृत्यू झाला तर पुढील 24 तासांत चौथा मृत्यू होतो. म्हणजे या गावात जोडीने मृत्यू होतात. हे आम्ही म्हणत नाही तर अलीगडमधील गांधी पार्क पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या भदेसी गावातील रहिवाशांनी याला पुष्टी दिली आहे. यामुळे पूर्ण गाव दहशतीच्या वातावरणात आहे. आताच तिथे चार जणांचा मृत्यू झाला आहे. यास कोणी योगायोग म्हणो वा गावकऱ्यांची अंधश्रद्धा, गावकरी मात्र यामुळे त्रस्त आहेत. भदेसी गावात वर्षानुवर्षे अशा घटना घडत आल्या आहेत, ज्या एखाद्या टीव्ही सीरियलमधील गोष्टी वाटतील. या घटना ऐकून व पाहून कोणीही चकित होऊ शकतं. गावातील वयस्कर लोकांच्या मते, गावात जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर पुढील 24 तासांत दुसरा मृत्यू हा ठरलेलाच. यामुळे या गावात सर्व लोकं भयभीत आहेत. जोडीने होतात गावात मृत्यू अलीगढमधील गांधी पार्क परिसरातील भदेसी हे गाव 100 वर्ष जुनं आहे. सुरुवातीला 200 लोकसंख्या असलेल्या या गावाची आजची लोकसंख्या ही 7000 ते 8000 च्या जवळपास आहे. भदेसी हे गाव दिल्ली-हावडा रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना वसलेलं आहे. गावचे सरपंच राहिलेले 72 ते 73 वर्षीय गंगावासी यांच्या मते, आता पर्यंत त्यांनी जोडीने मृत्यू झालेल्या अनेक घटना स्वतः पाहिल्या आहेत. गंगावासी म्हणतात की, गावात जर एखादा मृत्यू झाला तर 24 तास शांतता राहत नाही दुसरा मृत हा होतोच. ताज्या प्रकरणाबद्दल सांगायचं तर, गावातील बोहरा नावाच्या 22 वर्षांच्या तरुणाचा काही कारणाने मृत्यू झाला. त्यानंतर 4 दिवसांत टेनी, विष्णू आणि जीतूसह एकूण चौघांचा मृत्यू झाला. गावातील मृत्यूच्या मालिकेमुळे पुन्हा एकदा ही बाब चर्चेचा विषय बनली आहे. ही बाब गावातील लोक आपापल्या परीने सांगत आहेत. मात्र, प्रत्येकाने सांगितलेल्या गोष्टी एकमेकांशी जुळतात. हिंदू धर्मगुरू महामंडलेश्वर डॉ. पूजा शकुन पांडे यांच्याशी हिंदू प्रथा आणि कर्मकांडांशी संबंधित या विषयावर चर्चा केली, तर त्यांनी पितृदोष असल्याने असं घडत असल्याचं म्हटलंय. आता याला गावकऱ्यांची अंधश्रद्धा म्हणा वा निव्वळ योगायोगा, पण गावकरी मात्र या घटनांमुळे फार भयभीत आहेत.
गावातील प्रत्येक व्यक्ती यामुळे आहे चिंतेत गावातील वयस्कर लोकांकडून गावाचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करताना एक गोष्ट समोर आली की, वर्षानुवर्षे गावात जर एखाद्याचा मृत्यू झाला तर 24 तासात दुसरा मृत्यू होणं हे स्वाभाविक झालं आहे. एकाचा मृत्यू झाल्यानंतर दुसरा मृत्यू कोणाच्या कुटुंबात होणार या विचाराने गावकरी फार भयभीत असतात.