नवी दिल्ली, 7 मार्च : माणूस अन्न व पाण्याशिवाय जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही. पण एका घटनेत बोलिव्हियाचा एक माणूस अन्नाशिवाय अमेझॉनच्या घनदाट, धोकादायक जंगलात तब्बल 31 दिवस जिवंत राहिला. त्यानंतर त्याला रेस्क्यू करण्यात आलं. त्याने या दिवसांत जगण्यासाठी जंगलातील किडे खाल्ले आणि पावसाचं पाणी प्यायलं. त्याचा हा अनुभव चांगलाच चर्चेत आहे. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. 30 वर्षांचा जोनाथन अॅकोस्टा आपल्या चार मित्रांसह 25 जानेवारीला उत्तर बोलिव्हियामध्ये अमेझॉनच्या जंगलात शिकारीसाठी गेला होता. त्या चौघांची चुकामूक झाली आणि चौघं चार ठिकाणी गेले. जोनाथनजवळच्या बंदुकीत फक्त एक गोळी होती, त्याच्याजवळ आगपेटी किंवा टॉर्चही नव्हती. जोनाथनने सांगितलं की जिवंत राहण्यासाठी त्याच्याजवळ किडे खाण्याशिवाय पर्याय नव्हता. हेही वाचा - मुलासाठी काय पण! हौस म्हणून शिक्षकानं मुलाच्या वाढदिवसाला कापला चक्क 221 किलोचा केक
बीबीसीच्या वृत्तानुसार, अॅकोस्टा स्थानिक टीव्ही चॅनलशी बोलताना रडू लागला. ‘हे अद्भुत आहे. लोक इतके दिवस कोणालातरी शोधत राहतात. यावर मला विश्वास बसत नाहीये. मी जंगलातले किडे खाल्ले… जिवंत राहण्यासाठी मी काय केलं, ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही,’ असं तो म्हणाला.
जगण्यासाठी पपईसारखं जंगली फळही खाल्ल्याचं त्याने सांगितले. पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून तो सतत पाऊस पडावा, अशी देवाकडे प्रार्थना करायचा. पावसाचं पाणी बुटांत साठवून ते प्यायचा. पण काही दिवस पाऊस न पडल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला, त्यानंतर जिवंत राहण्यासाठी त्याने स्वतःची लघवी प्यायली.
जंगलात बिबट्यासारखा जॅग्वार आणि इतर हिंस्र पशूंचं जोनाथनला दर्शन घडलं. त्याने आपल्या शेवटच्या उरलेल्या बंदुकीच्या गोळ्यांपैकी एकाचा वापर कळपातील धोकादायक प्राण्यांना घाबरवण्यासाठी केल्याचं सांगितलं. तो स्वतःला 31 दिवस त्या जंगलात जिवंत ठेवण्यात यशस्वी झाला. नंतर त्याला रेस्क्यू टीमने शोधलं. जंगलात असताना त्याच्या पायाचा घोटा मुरगळला, त्याच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने चेहराही सुजला होता. त्याला रेस्क्यू केल्यानंतर हॉस्पिटलला नेलं आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले. चमत्कारिकरित्या बचावलेला अॅकोस्टा आता देवाला आपले जीवन समर्पित करणार आहे. मी पुन्हा कधीही शिकारीला जाणार नाही आणि देवासाठी संगीत बनवण्यात आपले आयुष्य घालवेन, अशी शपथ त्याने घेतली आहे. त्याचा लहान भाऊ होरासियो अॅकोस्टा म्हणाला, ‘माझा भाऊ आता देवासाठी संगीत बनवणार आहे, त्याने देवाला तसं वचन दिलंय.’ या पूर्वीही अशाच चमत्कारिक बचावाच्या घटना घडल्या आहेत. डोमिनिका या कॅरेबियन बेटावरील एक माणूस समुद्रात हरवला होता, त्यानंतर तो 24 दिवस केचप खाऊन जगला होता. तो समुद्रात हरवला तेव्हा त्याच्या बोटीमध्ये फक्त केचपची बाटली, लसूण पावडर आणि मॅगी होती. जिवंत राहण्यासाठी त्याने या गोष्टींमध्ये पाणी मिसळलं व ते खाऊन तो 24 दिवस जिवंत राहिला होता.