मुंबई, 27 जुलै : तंत्रज्ञानाच्या युगात अनेक नवे आविष्कार पाहायला मिळतात. त्यांचा किती तरी वेगवेगळ्या प्रकारे उपयोगही होतो. अॅपल कंपनीने आयफोनच्या रूपाने स्मार्टफोन विकसित केला आणि एक क्रांतीच झाली. अॅपलचा स्मार्टफोन प्रत्येकाला परवडत नसला, तरी आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जवळपास प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आहे. तरीही अॅपलच्या आयफोनचा रुबाब, त्याची वैशिष्ट्यं आणि खासियत वेगळीच आहे. त्याची फीचर्स किती उपयुक्त आहेत, याची थोरवी अनेकदा गायली जात असते. अलीकडेच घडलेल्या एका घटनेमुळे आयफोनचा युनिकनेस पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. चारशे फूट दरीत कार कोसळून झालेल्या अपघातातून कोणी व्यक्ती बचावण्याची शक्यता तशी कमीच; पण तसा अपघात झालेल्या एक आयफोन युझर मात्र आयफोनच्या साह्यामुळे स्वतःचा जीव वाचवू शकला. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या. अमेरिकेत लॉस एंजलीसमध्ये माउंट विल्सनच्या भागातून प्रवास करताना एका आयफोन युझरची कार तब्बल 400 फूट खोल दरीत कोसळली. त्या वेळी त्याच्याकडे असलेल्या आयफोन 14मुळे त्याचे प्राण वाचू शकले. अपघाताच्या ठिकाणी वाय-फाय कव्हरेज किंवा सेल्युलर नेटवर्क नव्हतं; मात्र कारचा अपघात झाला आहे, याची नोंद आयफोन डिव्हाइसने घेतली. त्यानंतर डिव्हाइसने तातडीने इमर्जन्सी सेंटरला एक टेक्स्ट मेसेज पाठवला. हा टेक्स्ट मेसेज पाठवण्यासाठी आयफोनने सॅटेलाइट कनेक्शनची मदत घेतली. एवढंच नव्हे, तर आयफोनमुळेच इमर्जन्सी टीमला त्या व्यक्तीचं नेमकं ठिकाणही कळलं. त्यामुळे मेसेज प्राप्त होताच इमर्जन्सी टीमला संबंधित व्यक्ती कुठे आहे हेही समजलं आणि तातडीने बचाव मोहीम राबवून त्याला वाचवण्यात आलं. आयफोन नसता, तर संबंधित व्यक्तीचं नेमकं ठिकाण कळणं अवघड होतं. तसंच, एवढा मोठा अपघात झाल्यामुळे संबंधित व्यक्तीला गंभीर जखमाही झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, आयफोनमुळे त्या व्यक्तीला तातडीने मदत मिळू शकली आणि त्याचा जीव वाचला. आयफोन 14मध्ये क्रॅश डिटेक्शन नावाचं एक डिफॉल्ट फीचर असतं. म्हणजे ते फोन घेतानाच त्यामध्ये असतं. इमर्जन्सी एसओएससाठी सॅटेलाइट कनेक्शनची सुविधा घ्यायची असल्यास आयफोन युझरला iOS 16.1 अपडेट आणि त्यानंतरचा अपडेट इन्स्टॉल करावा लागतो. हे सगळं संबंधित व्यक्तीच्या फोनवर केलेलं असल्यामुळे त्याचा आयफोन त्याचा रक्षणकर्ता ठरला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.