ग्वालियर, 14 डिसेंबर : कदाचित तुम्हाला या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास बसणार नाही, परंतु ही एक सत्य घटना आहे. ब्रेन ट्युमरचे (Brain tumor) ऑपरेशन सुरू असताना 9 वर्षाची एक चिमुरडी चक्क पियानो वाजवत होती. आणि येथे विशेष नमूद करावी अशी बाब म्हणजे ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन सुरू असताना तिला भूल देण्यात आली नव्हती. हे ऑपरेशन डॉक्टरांसाठी जितकं आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचं होतं, तितकंच आव्हानात्मक त्या मुलीसाठीही होतं. हे आव्हान त्या मुलीने अगदी सहज पेललं आहे. ही घटना मुरैना जिल्ह्यातील बामोर येथे राहणाऱ्या 9 वर्षीय सौम्याची आहे. तिला ब्रेन ट्यूमर होता. यामुळे 2 वर्षांपासून तिला अनेकदा फिट्स येत होत्या. त्यामुळे कुटुंबीयांना तिची काळजी वाटत होती. कुटुंबानी जेव्हा तिचा MRI केला तेव्हा तिला ब्रेन ट्युमरचं निदान असल्याचं समजलं. सौम्याच्या मेंदूत असणारा हा ट्युमर खुपच नाजूक ठिकाणी होता. एक छोटीशी चुकही सौम्याच्या जीवावर बेतणारी होती. त्यामुळे तिचं हे ऑपरेशन तिच्यासाठी जीवन मरणाचा लढा बनला होता. आणि लढ्याला हसत हसत सामोरं जायचं हे तिनं जणू ठरवूनच टाकलं होतं. तिनं शेवटी हा लढा जिंकलाचं.
विशेष बाब म्हणजे की ऑपरेशन करतेवेळी सौम्याला भूल दिली नव्हती, परंतु ज्या ठिकाणी ऑपरेशन केलं जाणार होतं, तिथे भूल दिली होती. ओपन सर्जरी पद्धतीनं हे ऑपरेशन होणार होती. येथे झालेली छोटीशी चुकही सौम्यासाठी प्राणघातक ठरणारी होती. सौम्याचं हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पडलं असून तिच्या शूरपणाचं सर्वांनी कौतुक केलं आहे.