मराठी बातम्या /बातम्या /Viral /अजगराला अंडी उबवता यावीत म्हणून कंपनीचा मोठा निर्णय; 54 दिवस थांबवलं महामार्गाचं काम

अजगराला अंडी उबवता यावीत म्हणून कंपनीचा मोठा निर्णय; 54 दिवस थांबवलं महामार्गाचं काम

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अजगराच्या उबेशिवाय (Warmth) अंड्यांतून पिल्लं बाहेर पडू शकत नाहीत. अजगराची अंडी उबविण्यासाठी 27 अंश सेल्सिअस आणि 31 अंश सेल्सिअस यादरम्यानचं तापमान आवश्यक असतं.

  तिरुअनंतपुरम 16 मे : विकास (Development) आणि पर्यावरण (Environment) या दोन गोष्टी अनेकदा परस्परविरोधी (Contradictory) ठरतात. विकासकामं करताना बहुतांश वेळा पर्यावरणाला हानी पोहोचते आणि पर्यावरण संरक्षणाचा आग्रह धरल्यास विकास साधणं कठीण होतं, ही वस्तुस्थिती आहे. विकासकामांमध्ये पर्यावरणातल्या विविध घटकांची हानी (Damage) होते, अशी ओरड अनेकदा आपल्या कानांवर पडते. विशेषत: रस्ते निर्मितीच्या (Road Construction) कामात हा प्रकार जास्त दिसतो. रस्ते तयार करताना अडथळा करणारी जंगलं आणि झाडं मोठ्या प्रमाणात तोडली जातात. परिणामी त्या ठिकाणच्या परिसंस्था (Ecosystem) आणि वेगवेगळ्या सजीवांचे अधिवास (Habitat) संकटात येतात.

  विकासकामांचा पुरस्कार करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते याला पर्याय नाही; मात्र केरळमधल्या एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं (Infrastructure Company) हे शक्य करून दाखवलं आहे. उरलुंगल लेबर कॉन्ट्रॅक्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (ULCCS) ही इन्फ्रा कंपनी कासारगोडमध्ये (Kasaragod) फोर लेन हायवे (Four-lane Highway) बांधण्याचं काम करत आहे. कंपनीनं आपलं हे काम 54 दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अजगराच्या एका मादीला (Female Python) आपली 24 अंडी (Eggs) उबवता (Hatch) यावीत, यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  तहानलेल्या बिबट्याच्या बछड्यांना बाटलीने पाजलं पाणी; अहमदनगरमधील वनकर्मचाऱ्याचा Video Viral

  20 मार्च रोजी एरियाल येथे 'सीपीसीआरआय'जवळ (CPCRI) नॅशनल हायवे क्रमांक 66च्या (NH 66) रुंदीकरणाचा एक भाग म्हणून कामगार एक कल्व्हर्ट (जमीनीखालून खोदलेला छोटा खंदक) बांधत होते. त्या वेळी कामगारांना एका बिळामध्ये इंडियन रॉक पायथॉन (Indian Rock Python) अर्थात अजगर दिसला. त्यांनी तत्काळ वनविभागाला (Forest Department) याची माहिती दिली. वन विभागाच्या मते, रस्त्याच्या लेव्हलपासून चार फूट खाली असलेलं हे बिळ साळिंदरानं (Porcupine) तयार केलेलं होतं. अर्थमूव्हरनं तिथं खोदकाम झालं नसतं तर ते कधीही दिसलं नसतं.

  कायद्यानं अजगरांना संरक्षण पुरवलेलं आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या (Wildlife Conservation Act) अनुसूची I अंतर्गत त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. भारतात वाघांप्रमाणेच अजगरांनादेखील हाय लेव्हल लीगल प्रोटेक्शन (Legal Protection) मिळालं आहे. त्यामुळे रस्ते खोदकामात सापडलेल्या अजगराचं संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागावर आली. वन विभागानं सर्पमित्र अमीन यांना पाचारण केलं. अमीन चरितार्थासाठी अ‍ॅल्युमिनियम फॅब्रिकेशन युनिट चालवतात. सापांची सुटका (Rescuing Snakes) करण्याचा 10 वर्षांचा अनुभव त्यांना आहे. सोबतच वन विभागानं यूएलसीसीएसला कल्व्हर्टचं काम स्थगित करण्यास सांगितलं. कासारगोडचे विभागीय वन अधिकारी (Divisional Forest Officer) पी बिजू म्हणाले, 'हा एक टाइम बाउड रोड प्रोजेक्ट आहे. तरीदेखील कंपनीनं वन विभागाची विनंती मान्य केली. त्यांनी सहकार्य केलं नसतं तर एनएचएआयकडे (NHAI) जाऊन काम थांबवण्याची परवानगी मिळवणं कठीण झालं असतं.'

  अमीन यांनी बिळाची पाहणी केली असता त्यामध्ये अजगराची अनेक अंडी दिसली. या अंड्यांभोवती मादी वेटोळं घालून बसली होती. अशा स्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे यासाठी नेपाळमधल्या मिथिला वाइल्डलाइफ ट्रस्टमधले वाइल्ड लाइफ रिसर्च हेड आणि हर्पेटॉलॉजिस्ट (Herpetologist) मावीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मावीश कुमार (Maveesh Kumar) हे मूळचे कासारगोडचे रहिवासी आहेत. त्यांनी अजगर आणि त्याची अंडी न हलवण्याचा सल्ला दिला. कारण अजगराच्या उबेशिवाय (Warmth) अंड्यांतून पिल्लं बाहेर पडू शकत नाहीत. अजगराची अंडी उबविण्यासाठी 27 अंश सेल्सिअस आणि 31 अंश सेल्सिअस यादरम्यानचं तापमान आवश्यक असतं. तापमान वाढल्यास पिलांचा मृत्यू होण्याची किंवा विकृतीसह जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळं अंडी योग्य तापमानात राहावीत यासाठी मादी अंड्यांभोवती वेटोळं घालून बसत असते.

  झाडाच्या फांदीवर चढण्यासाठी डझनभर किंग कोब्रा आपसात भिडले, अंगावर काटा आणणारा VIDEO

  यूएलसीसीएस, वन विभाग आणि अमीन यांनी एकत्र येऊन या पिलांच्या सुरक्षित जन्माची जबाबदारी घेतली. यूएलसीसीएसनं अंड्यातून पिलं बाहेर येईपर्यंत इतरत्र काम करण्याचा निर्णय घेतला. अमीन दिवसातून एकदा किंवा दोनदा या अंड्यांची पाहणी करत असत.

  अजगराची अंडी उबायला सुमारे 60 ते 65 दिवस लागतात. बांधकाम कामगारांना अजगर सापडल्यापासून 54व्या दिवशी ही अंडी फुटू लागली. म्हणजेच त्याआधी आठवडाभरापूर्वीच अजगरानं ती दिली असावीत. एकदा अंडी फुटायला सुरुवात झाली की आईची उपस्थिती आवश्यक नसते. नैसर्गित स्थितीमध्ये आई जरी अंड्यांपासून दूर निघून गेली तरी त्यांना झाकण्यासाठी आजूबाजूला झुडपं आणि झाडं असतात. परंतु, या ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे आसपासची जमीन उजाड झालेली होती. त्यामुळं जर अंडी त्याचठिकाणी ठेवली असती तर, गरुड, कावळे आणि इतरांनी या पिल्लांची सहज शिकार केली असती. म्हणून आम्ही ती अंडी माझ्या घरी हलवण्याचा निर्णय घेतला. मी बिळात जाऊन अंडी बाहेर काढली. विशेष म्हणजे त्या वेळी मादी तिथेच होती तरीदेखील तिनं हल्ला केला नाही, अशी माहिती अमीन यांनी दिली.

  कासारगोड येथे अमीनच्या घरी सर्व 24 अंड्यांतून पिल्लं जन्मली. त्यानंतर त्या पिलांना मुलेरियातील (Mulleria Forest) जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. वनविभाग, इन्फ्रा कंपनी आणि डेडिकेटेड स्नेक रेस्क्यूर यांच्या एकत्रित प्रयत्नांनी सर्व 24 अंड्यांतल्या पिलांचा सुखरूप जन्म झाला. आधी 15 आणि नंतर नऊ पिल्लांना जंगलात सोडण्यात आलं.

  First published:
  top videos

   Tags: Positive story, Python