दिल्ली, 24 जुलै : भारतात बासमती तांदूळ वगळता अन्य सर्व प्रकारच्या तांदळांच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केला. आगामी काळ सण-उत्सवांचा आहे. त्या काळात तांदळाच्या देशांतर्गत मागणीत होणारी वाढ आणि किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही निर्यातबंदी जाहीर केली आहे. कारण बासमतीव्यतिरिक्त अन्य तांदळांच्या किमतीत देशांतर्गत बाजारपेठेत वाढ होत असल्याचं केंद्र सरकारच्या निदर्शनास आलं. अर्थात, बासमती तांदळाच्या निर्यातीवर मात्र बंदी घालण्यात आलेली नाही. भारतातून बासमती तांदळांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. भारताने तांदळाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेतल्या ग्राहकांची धावपळ झाली आहे. तांदूळखरेदीसाठी सुपरमार्केट्समध्ये मोठी गर्दी होऊ लागल्याचं चित्र अनेक व्हायरल व्हिडिओमधून दिसत आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण तांदळांपैकी 25 टक्के पांढरे तांदूळ बासमतीव्यतिरिक्त अन्य जातींचे असतात. बासमतीशिवायच्या अन्य जातींच्या पांढऱ्या तांदळांची भारतातून झालेली निर्यात 2021-22मध्ये 2.62 मिलियन अमेरिकी डॉलर्सची, तर 2022-23मध्ये 4.2 मिलियन अमेरिकी डॉलर्स होती. भारतातून बासमतीव्यतिरिक्त अन्य पांढऱ्या तांदळांची सर्वाधिक निर्यात थायलंड, इटली, स्पेन, श्रीलंका आणि अमेरिका या देशांत होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतत सुमारे 15.54 लाख टन पांढऱ्या तांदळांची निर्यात झाली आहे. एक वर्षापूर्वी याच काळातली निर्यात केवळ 11.55 लाख टन एवढीच होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या तिमाहीतच निर्यातीत 35 टक्के वाढ झाली आहे.
#RiceExportBan US going crazy. This is at Costco.
— Anjan Dukh Bhanjan (@YehLoKalloBaat) July 22, 2023
(Received via a friend) pic.twitter.com/lOOucTlKf0
भारत जगभरातल्या 100हून अधिक देशांमध्ये तांदळांची निर्यात करतो. 2012पासून भारत हा तांदळांचा मोठा निर्यातदार देश आहे. त्यामुळे आता भारतात निर्यातबंदी लागू करण्यात आल्याने अमेरिकेसह अन्य देशांमध्येही अशा प्रकारची अस्वस्थता पाहायला मिळू शकते, असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारपेठेत तांदळांच्या किमतीत वेगाने वाढ होत असल्याचं दिसत आहे. या महिन्यात तर तांदळाच्या किमतींत 10 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे या किमती नियंत्रणात राहण्यासाठी ही निर्यातबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय जाहीर होण्याच्या आधी काही जहाजांमध्ये तांदळाची पोती भरण्याचं काम सुरू झालेलं असेल, तर त्यांच्या निर्यातीला परवानगी असेल, असं जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेतल्या ग्राहकांची तांदूळखरेदीसाठी धावपळ सुरू झाली असल्याचं चित्र दर्शविणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडिओजच्या सत्यतेबाबत पडताळणी करण्यात आलेली नाही; मात्र ते व्हिडिओज तिथल्या स्थानिक नागरिकांनी शेअर केले आहेत. स्टोअर्समध्ये होत असलेली गर्दी त्यात दिसत असून, एकेक व्यक्ती तांदळांची 10-10 पॅकेट्स खरेदी करताना दिसत आहे. 9 किलो तांदळांचं एक पॅरेट 27 डॉलर्स अर्थात 2215 रुपयांना विकलं जात आहे. काही जण तर चक्क सुट्टी घेऊन तांदूळ खरेदीसाठी रांगेत उभे राहिले आहेत, असंही सांगितलं जात आहे. अमेरिकेत भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येने राहतात. तांदूळ हा त्यांच्या दैनंदिन आहारातला मुख्य घटक आहे. त्यामुळे तिथले नागरिक सुपरमार्केट्सच्या बाहेर तांदूळखरेदीसाठी रांगा लावत आहेत, असं सांगितलं जात आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या तांदळांना अमेरिकेत मोठी मागणी आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातबंदीच्या निर्णयानंतर तिथे अशी परिस्थिती उद्भवली आहे. काही ठिकाणी स्टोअर्समध्ये मोठी गर्दी होत असल्यामुळे तांदळांच्या किमती बेसुमार वाढवल्या गेल्या असल्याचंही काही वृत्तात म्हटलं आहे.