न्यूयॉर्क, 23 नोव्हेंबर : जगातली सहाव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेले बिल गेट्स त्यांच्या सामाजिक कार्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. अनेक देशांमध्ये त्यांनी त्यांच्या संस्थेद्वारे सामाजिक कामासाठी मदत दिली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांबाबतही ते जागरूक असतात. नुकतंच ‘लिंक्ड इन’वरच्या एका पोस्टमध्ये त्यांनी जगातल्या अस्वच्छतेच्या प्रश्नाबाबत लिहिलं आहे. या संदर्भात जगजागृती करताना प्रसंगी टॉयलेटचा घाण वास घेतल्याचं आणि गटाराचं पाणीही प्यायल्याचं त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलंय. अस्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य याबाबत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी लिंक्ड इनवर एक पोस्ट लिहिली आहे. जगभरात ही पोस्ट सध्या भरपूर व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, की “मी गेल्या काही वर्षांत अनेक विचित्र कामं केली आहेत. अमेरिकन कॉमेडियन जिमी फालॉनसोबत मी गटाराचं पाणी प्यायलोय. तसंच टॉयलेटची दुर्गंधीही घेतलीय. काचेच्या बरणीमध्ये मानवी विष्ठा घेऊन मंचावर उभा राहिलोय.” अशा अनेक विचित्र गोष्टी एका चांगल्या कामासाठी केल्याचं ते म्हणतात. या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला हसू येईल; पण जगातल्या 3.6 बिलियन नागरिकांवर प्रभाव पाडणाऱ्या अस्वच्छता या विषयाबाबत जनजागृती करणं हाच नेहमी आपला उद्देश असतो, असं त्यांनी म्हटलंय. स्वच्छता या विषयाबाबत गेट्स यांनी अनेक देशांमध्ये जाऊन जनजागृती केली आहे. या संदर्भात 2018मधल्या एका घटनेचा संदर्भ त्यांनी दिला आहे. विकसनशील देशांमध्ये अपुऱ्या शौचालयांच्या विषयाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी बीजिंगमध्ये एका काचेच्या बरणीत मानवी विष्ठा घेऊन ते मंचावर गेले होते. लिंक्ड इनवरच्या पोस्टमध्ये त्यांनी जगातले इंजिनीअर्स आणि शास्त्रज्ञांचे आभारही मानले आहेत. अनेक आजार आणि तापाच्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय शोधण्यात शास्त्रज्ञांच्या असलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. वाचा - संपूर्ण जग झालं होतं हैराण; या मेंढ्यांच्या विचित्र वागण्याचं रहस्य अखेर उलगडलं बिल गेट्स यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अस्वच्छतेबाबत आणखी काही निरीक्षणं नोंदवली आहेत. जगातल्या 3.6 बिलियन नागरिकांकडे म्हणजे जवळपास निम्म्या लोकसंख्येकरिता पुरेशी शौचालयं नाहीत. शौचालयं नसल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. एखाद्या मोठ्या संकटाप्रमाणेच हे आहे. अस्वच्छतेमुळे जमीन, पाणी आणि अन्नाचं प्रदूषण होतं. यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू होतो. काही निष्कर्षांनुसार, डायरिया आणि अस्वच्छतेसंदर्भातल्या आजारांमुळे दर वर्षी 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अंदाजे 5 लाख मुलांचा मृत्यू होतो.
या पोस्टमध्ये जुलै 2021मधली एक लिंकही देण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वच्छतेसाठी नवे उपाय शोधण्याची गरज त्यांनी त्यात व्यक्त केली होती. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने 10 वर्षांपूर्वी जगातली शौचालयं पुन्हा बनवण्याचं आव्हान दिलं होतं, याबाबतही त्यांनी पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. बिल गेट्स यांनी सप्टेंबरमध्ये घरगुती वापरासाठी पाण्याशिवाय वापरता येणाऱ्या शौचालयाची प्रतिकृती सॅमसंगसोबत तयार केली होती. या शौचालयात घन विष्ठेचं रूपांतर राखेत केलं जातं. स्वच्छतेबाबत बिल गेट्स त्यांच्या संस्थेमार्फत जगजागृती करत असतात. त्यासाठी ते निधीही उपलब्ध करून देतात.