नवी दिल्ली, 21 जून : आज जागतिक योग दिन (21 जून) जगभरात उत्साहात साजरा करण्यात येतोय. हा दिवस योगासनं करून साजरा केला जातो. योगासनाचा एक भाग म्हणजे सूर्यनमस्कार. अनेकजणांनी सूर्यनमस्कार हा स्वतःच्या व्यायामाचा नियमित भाग बनवला आहे; पण तुम्ही कधी बिबट्याला ‘सूर्यनमस्कार’ घालताना पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी बिबट्या सूर्यनमस्कार करत असल्याचा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला होता. जागतिक योग दिनाच्या निमित्तानं हा व्हिडिओ वेगानं व्हायरल झालाय. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय. ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या निमित्तानं सोशल मीडियावर अनेकजण ‘योग’ करतानाचे विविध व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण कदाचित बिबट्याला योगा करताना तुम्ही कधी पाहिलं नसेल. पण ट्विटरवर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून त्यामध्ये बिबट्या चक्क सूर्यनमस्कार करताना दिसतोय. हा व्हिडिओ 27 मार्च 2023 रोजीचा असला तरी तो सध्या वेगानं व्हायरल होतोय.
व्हिडिओमध्ये नेमकं काय? 27 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये बिबट्या स्वतःच्या शरीराला ‘स्ट्रेच’ करताना दिसतोय. तो त्याचे पुढचे पंजे पुढे सरकवताना शरीराचा भाग थोडा वर खेचतो, व यानंतर स्वतःच्या शरीराचा भाग पुढे खेचत असताना मागच्या बाजूला खाली वाकतो. बिबट्याची ही स्टाईल पाहून अनेकांना तो ‘सूर्यनमस्कार’ करतोय, असं वाटू लागलंय! व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतांश युजर्सनी त्यावर कमेंट दिल्यात. एका युजरनं लिहिलं आहे की, ‘बिबट्या शिकार करण्यापूर्वी स्वतःला लवचिक बनवण्यासाठी शरीर ताणत आहे.’ तर आणखी एकानं लिहिलं आहे की, ‘बिबट्याला योग कोणी शिकवला, ना योग शिक्षक, ना युट्युब, ना कोणतंही पुस्तक.’ ‘फिटनेस फ्रीक लेपर्ड,’ अशीही कमेंट एका युजरनं केली असून, या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडतोय.
Surya Namaskar by the leopard 👌👌
— Susanta Nanda (@susantananda3) March 27, 2023
Via @Saket_Badola pic.twitter.com/jklZqEeo89
व्हिडिओला मिळाले लाखो व्ह्युज जंगलातील या अद्भुत दृश्याचा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘बिबट्याचे सूर्यनमस्कार.’ या व्हिडिओला अनेकजण पसंत करत असून आतापर्यंत तो 2 लाख 53 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओला साडेचार हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळालेत. या शिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकजण हा व्हिडिओ शेअर करताना दिसतात. दरम्यान, जागतिक योग दिनाचा सर्वत्र उत्साह दिसून येत असून, त्यातच हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्यानं तो अनेकांना पसंत पडतोय.