दैनंदिन आयुष्यातील धावपळ आपल्या सर्वांना थकवते. कधीकधी ऑफिसमध्ये वाद होतात. मग राग आला की सगळं सोडून घरी बसावं असं वाटतं; पण जीवन जगण्यासाठी पैशाची गरज असते आणि त्यासाठी काम करावं लागतं. एका 29 वर्षांचा तरुणाने मात्र वेगळा विचार केला. कॉर्पोरेट कल्चरला तो इतका कंटाळला होता की त्याने चांगली नोकरी सोडली. पैसे कमी पडू लागल्याने तो तंबूमध्ये राहू लागला. खर्च कमी केले पण काम केलं नाही, त्याला फक्त आराम करायचा आहे. प्रकरण चीनच्या सिचुआन प्रांतातील आहे. ली शू नावाच्या या व्यक्तीने 2018 मध्ये आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये आरामात वेळ घालवू लागला. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की पैसे न कमावता खर्च केल्यास त्याची बचत संपेल. तेव्हापासून त्याने दैनंदिन खर्चात कपात करण्यास सुरुवात केली. फक्त 120 रुपयांत संपूर्ण दिवस घालवायला सुरुवात केली. तरीही घरभाडे भरण्यासाठी पैशांची गरज होती, म्हणून त्याने आपलं सर्व सामान विकलं. यातून त्याला पाच हजार रुपये मिळाले, त्याचा तंबू विकत घेऊन तो पार्कमध्ये राहू लागला. मागच्या 200 दिवसांपासून तो पार्कमध्ये राहतोय, पण त्याला पुन्हा कॉर्पोरेटमध्ये काम करायचं नाही. नूडल्स खाऊन जगतोय - ली शूकडे सध्या असलेली सर्वांत मौल्यवान गोष्ट म्हणजे त्याचा जुना तंबू आहे. तो नूडल्स आणि इतर स्वस्त अन्नपदार्थ खातो. कधीकधी त्याला स्वयंपाक करावासा वाटतो तेव्हा तो फक्त बटाटे आणि अंडी शिजवतो. पाण्यासाठी त्याला लांब जावं लागतं. तसंच तंबूमध्ये वीज नसल्याने फोन चार्ज करण्यासाठी त्याला इतरांची मदत घ्यावी लागते. असं असूनही त्याला हे आयुष्य आवडतंय. शू म्हणाला, “मला कोणी ओरडणारं नाही. सल्ला देणारं किंवा चुकांवर बोलणारं, त्रास देणारं कुणी नाही. ही माझी चॉइस आहे. मला शांतता आणि आराम मिळतोय. हळूहळू तुम्हाला अशा परिस्थितीची सवय होईल आणि हे खूप आरामदायक आहे.” मित्रांच्या ऑफर्स नाकारल्या - या तरुणाने चिनी पत्रकारांना सांगितले, माझ्याकडे नोकऱ्यांची कमतरता नाही. अनेक मित्रांनी ऑफरही दिल्या. काहींनी तर मला तिथं जाऊन राहता यावं म्हणून घरं ऑफर केली. काहींनी मला बिझनेससाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली. पण या सगळ्यानंतर आयुष्यात तीच धावपळ सुरू होईल, जी मला नको आहे. मला माझं साधं आणि कमी खर्चिक जीवन जगायचंय. ली शूच्या तंबूच्या बाजूला एक चिठ्ठी लावलेली आहे. त्यावर ‘कृपया ये-जा करणाऱ्यांनी माझं सामान खराब करू नये. तुम्हाला काही गैरसोय होत असेल तर मी नम्रपणे माफी मागतो’ असं लिहिलंय. लीच्या कहाणीने चीनमध्ये लेइंग डाउन मूव्हमेंटची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. बऱ्याच जणांना आराम करण्याची इच्छा असते, पण कॉर्पोरेट नियमांमुळे त्यांना ते शक्य नसतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.