मुंबई, 11 डिसेंबर : उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग ही म्हण तर आपणा सर्वांना माहितीच आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) अशाच एका उतावळ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. पण हा नवरा बाशिंग बांधण्यासाठी नव्हे तर भलत्याच कारणासाठी उतावळा झाला आहे (Groom video). लग्नाच्या (Wedding video) विधी सोडून त्याने भरमंडपातच असं काही केलं ही पाहून सर्वांनाच धक्का बसला.
लग्नाऐवजी भलत्याच गोष्टीसाठी उतावळा झालेल्या या नवरदेवाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. नवरदेवाने लग्नात अक्षरशः धिंगाणा घातला आहे. त्याच रूप पाहून नवरीसोबत इतर पाहुणेही शॉक झाले. नवरीने त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण नवरदेव इतका सैराट झाला होता की तो कुणाचंच काही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. लग्न गेलं उडत असंच त्याचं वागणं होतं.
आता नेमकं या नवरदेवाने असं काय केलं आहे हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. एरवी लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरी दोघंही एकमेकांना पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. एकमेकांसमोर येताच जरी तोंडाने एकमेकांशी बोलत नसले तर त्यांच्या नजरा एकमेकांशी बोलत असतात. एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसणं, हळूच इशारे करणं, लाजणं असेच रोमँटिक क्षण ते यावेळी अनुभवत असतात. पण लग्नाच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत असं काहीच दिसलं नाही. नवरदेव नवरीबाईसोबत रोमँटिक होणं सोडा उलट तो लग्न सोडून डान्स करू लागला.
व्हिडीओत पाहू शकता लग्नाचा मंडप आहे. नवरा-नवरी एकमेकांशेजारी बसले आहेत. समोर पंडित बसले आहेत आणि आजूबाजूला पाहुणे, नातेवाईक आहेत. लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. इतक्यात डीजेवर गाणं वाजतं आणि मध्येच नवरदेवाच्या अंगात काहीतरी संचारल्यासारखं होतं.
गाणं ऐकू येताच नवरदेव मध्ये मध्ये हलताना दिसतो. तो स्वतःवर खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी त्याच्यातील डान्सर जागा होतोच. नवरदेव अंगात आल्यासारखं उठतो आणि नाचू लागतो. त्याला पाहून नवरीही शॉक होते. ती त्याचा हात धरून त्याला खाली बसवते. पण तो मात्र पुन्हा उठून उभा राहतो आणि लग्नाच्या विधी सोडून नाचत दुसरीकडे जातो. आपल्यासोबत तो आपल्या नवरीलाही खेचत घेऊन जातो.
नवरदेव नाच नाच नाचतो आणि त्याच्यासोबत पंडितही मजा करताना दिसतात. नवरी सुरुवातीला त्या दोघांना पाहतच राहते. मग नवरदेव तिच्याजवळ येतो आणि काही स्टेप्स करतो त्यानंतर नवरीही नाचू लागते.
memes.bks इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल आहे. लग्न गेलं उडत आधी डान्स असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांना हा व्हिडीओ आवडला आहे. त्यांनी नवरदेवाचा स्वॅग आणि कूल अंदाज म्हटलं आहे. काहींनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत तर काही जणांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Dance video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video