मुंबई, 18 नोव्हेंबर : अनेकांना काही तरी वेगळं करून दाखवायची खूप इच्छा असते. अर्थात, त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. बाकीच्यांचं लक्ष वेधून घेणं हाच यामागचा हेतू असतो. तुम्ही काही विचित्र किंवा चमत्कृतीपूर्ण गोष्ट केली, की तुम्ही क्षणात जगाच्या कानाकोपर्यात पोहोचता. असे अनेक व्हायरल व्हिडिओ आपण रोज पाहतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत लग्नाच्या ठिकाणी नवरदेव एका कॉफिन बॉक्समधून पोहोचल्याचं दिसतंय. ही चक्रावून टाकणारी घटना आहे. यामुळे हा व्हिडिओ खूप व्हायरल झालाय. लग्न करणार्या प्रत्येकासाठी तो आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. आयुष्यातला हा टप्पा किंवा याची सुरुवात अविस्मरणीय व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी विविध नियोजन केलं जातं. डेकोरेशन, जेवण, पोशाख, या सगळ्यांवर खूप खर्च केला जातो. काही जण मोठ्या लॉनवर लग्न करतात, काही जण फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न करतात. प्रत्येक जण आपल्या ऐपतीनुसार हा सोहळा लक्षवेधी करायचा प्रयत्न करतो; पण म्हणून कुणी लग्नाच्या ठिकाणी कॉफिन बॉक्समधून नक्कीच येत नाही. ख्रिश्चन धर्मीयांमध्ये मनुष्याचा मृत्यू झाला, की त्याला कॉफिन बॉक्समध्ये ठेवलं जातं. सगळे अंत्यविधी पूर्ण झाले की हा मृतदेह कॉफिन बॉक्ससहित जमिनीत दफन केला जातो. या अजब नवरदेवाने कॉफिन बॉक्सचा उपयोग वेडिंग व्हेन्यूवर जाण्यासाठी केला. ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. वाचा - Ex-Boyfriend ला जळवण्यासाठी लग्नाचा खेळ, Video पाहून नवरदेवाची येईल कीव न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, हा विचित्र प्रकार अमेरिकेतला आहे. एंटरटेन स्कॉलर्स या नावाच्या यू-ट्यूब अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. 1 मिनिट 11 सेकंदांच्या या व्हिडिओला हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सोशल मीडियावर लग्नाचा हा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका गाडीतून काही पुरुष आणि महिला हसत-हसत कॉफिन बॉक्स घेऊन येताना दिसत आहेत. आजूबाजूचं वातावरण लग्नसमारंभाचं आहे हे सहज लक्षात येतं. परंतु, कॉफिन बॉक्स तिथे आणला गेल्याने व्हिडिओ पाहताना आपल्याला धक्का बसतो. पुढे हा कॉफिन बॉक्स उपस्थितांसमोर ठेवला जातो. बॉक्स घेऊन येणारे स्त्री-पुरुष तिथेच उभे राहतात. एक व्यक्ती हा कॉफिन बॉक्स उघडते आणि त्यातून चक्क सुटाबुटातला नवरदेव उठून उभा राहतो.
लग्नसमारंभात नवरदेव घोड्यावरून, तर काही वेळा गाडीतून येतो. तो उत्सवमूर्ती असल्याने सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच असते. परंतु, अमेरिकेतल्या या तरुणाची स्वतःच्या लग्नस्थळी कॉफिन बॉक्समधून एंट्री घेण्याची कल्पना फारच अजब आहे.