मुंबई, 19 ऑगस्ट : यंदा दोन वर्षांच्या ब्रेकनंतर राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणी नियम पायदळी तुडवल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. वाहतुकीचे नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असतात. मात्र आज दहीहंडीच्या निमित्ताने नियमांची पायमल्ली करण्यात आली. अशा साहसवीर गोविंदाचा भलताच आवेश मुंबईत पाहायला मिळाला. कायदा, नियम याची खुलेआम पायमल्ली केली जात होती. मुंबईच्या रस्त्यावर, बिनधास्त ट्रिपल सीटवरुन प्रवास केला जात होता. चक्क वाहतूक पोलिसांच्या समोर वाहतूक नियम धाब्यावर बसवले जात होते. हेल्मेट तर कोणीच घातलेलं दिसलं नाही. पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचंही दिसून आलं. Dahi Handi Celebrations : मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्साह, आतापर्यंत इतके गोविंदा जखमी दरम्यान, मुंबईमध्ये दहीहंडीचे थर रचताना काही गोविंदाही जखमी (Govinda Injured) झाले आहेत, याबाबतची माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत 24 गोविंदांना दुखापत झाली, यातल्या 19 जणांना उपचार करून सोडून देण्यात आलं आहे, तर 5 जणांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या कोणत्याही गोविंदाची प्रकृती गंभीर नाही.
जखमी झालेल्या गोविंदांपैकी जेजे रुग्णालयात 2, नायर रुग्णालयात 5, केईएममध्ये 9, ट्रॉमा रुग्णालयात 1, कुपर रुग्णालयात 2, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवलीमध्ये 1, पोद्दार रुग्णालयात 4 गोविंदांवर उपचार करण्यात आले. दुपारी 3 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.