मुंबई 12 ऑक्टोबर : इंधनाचे वाढते दर आणि वाढत्या वायू प्रदूषणामुळे लोकांचा इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदीकडे कल वाढत आहे. ग्राहकांची मागणी आणि गरज ओळखून भारतीय मार्केटमध्ये विविध कंपन्यांनी खास फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर लॉंच केल्या आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकल्समुळे इंधनाचा खर्च आणि प्रदूषण कमी होणार आहे. मात्र प्रमुख शहरांमध्ये नेहमीच होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा त्रास फारसा कमी होणार नाही. सरकार आणि प्रशासन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना करत असलं तरी हा प्रश्न तात्काळ सुटेल अशी शक्यता नाही. वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी कदाचित प्रगत तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल असं काहीसं चित्र दिसत आहे. कारण दुबईत नुकतीच पहिल्या ‘फ्लाईंग इलेक्ट्रिक कार’ अर्थात उडत्या इलेक्ट्रिक कारची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या कारमध्ये खास फीचर्स देण्यात आली आहेत. या कारमधून दोन व्यक्ती सहज प्रवास करू शकणार आहेत. तसंच या कारचा वेगही उत्तम आहे. दुबईत पहिल्यांदाच उडत्या कारने हवेत उड्डाण केलं आहे. या कारचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केला जाईल. आठ प्रोपेलर्स असलेल्या या उडत्या कारमधून दोन व्यक्ती प्रवास करू शकतील. ही कार ताशी 130 किमी वेगानं हवेत उडू शकते. ही कार व्हर्टिकल लँडिंग आणि टेकऑफ करण्यास सक्षम आहे म्हणजेच ही कार सरळ उड्डाण करून थेट जमिनीवर उतरू शकते. उडत्या कारच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. माणसांना घेऊन उड्डाण करणं किती सुरक्षित असेल हा प्रश्नही अनुत्तरीतच आहे. प्रश्न उपस्थित झाले असले तरी दुबईत येत्या काही वर्षांत या उडत्या कारने प्रवास सुरू करण्याची योजना आखली जात आहे.
FLYING CAR LIFTS OFF IN DUBAI!
— Lovin Dubai | لوڤن دبي (@lovindubai) October 11, 2022
Unveiled at GITEX GLOBAL, the XPENG AEROHT is the largest flying car company in Asia. Not available for sale just yet, their vehicle is reportedly up and running for test flights. 1/2 pic.twitter.com/nhMgLvOYQz
दुबईत नुकतीच चाचणी घेण्यात आलेल्या उडत्या कारची निर्मिती इलेक्ट्रिक व्हेईकल उत्पादक कंपनी Xpeng Inc ने केली आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील हे एक मोठं यश मानलं जात आहे. या मानवविरहित कारची चाचणी सोमवारी (11 ऑक्टोबर) घेण्यात आली. विशेष म्हणजे ही चाचणी यशस्वी झाली आहे. या उडत्या कारमध्ये माणसांना बसवून जुलै 2021 मध्ये चाचणीदेखील करण्यात आली होती, असं कंपनीनं सांगितलं आहे. ही कार पूर्णतः इलेक्ट्रिकवर चालते. त्यामुळे कार्बन उत्सर्जन होत नाही. ही कार सुमारे 500 किलोपर्यंतचा भार उचलू शकते. ही स्वायत्त उड्डाण क्षमता आणि उड्डाण नियंत्रण प्रणालीने सुसज्ज आहे. आगामी काळात अशा उडत्या कार दुबईमध्ये विविध कारणांसाठी वापरल्या जाऊ शकतात. नवीन उडती कार ही एक खास लग्झरी सुविधा आहे. श्रीमंत व्यक्ती अशा छान गोष्टींचा नेहमीच शोध घेत असतात. दुबई हे असं ठिकाण आहे, जिथं असे ग्राहक आहेत हे आम्ही ठामपणे म्हणू शकतो, असं दुबई चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेतील आंतरराष्ट्रीय कार्यालयांचे कार्यकारी संचालक उमर अब्दुल अजीज अलखान यांनी सांगितलं.