मुकेश राजपूत, प्रतिनिधी बुलंदशहर, 29 जून : उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये तैनात असलेल्या महिला आयपीएस अधिकारी अनुकृती शर्मा यांनी केलेल्या एका कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आयपीएस अधिकारी अनुकृती शर्मा यांच्या सतर्कतेमुळे झोपडीत अंधारात राहणाऱ्या एका विधवा महिलेला वीजेचे कनेक्शन मिळाले आहे. इतकेच नाही तर अनुकृती शर्मा यांनी स्वतः या विधवेच्या वीज कनेक्शनचे पैसे दिले. आयपीएस अधिकारी अनुकृती शर्मा यांनी सांगितले की, महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत बुलंदशहरच्या अगौता पोलीस स्टेशन हद्दीतील खेडी गावात महिला आणि मुलींसाठी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृद्ध विधवा नूरजहाँ यांनी पैशांअभावी झोपडीत वीज कनेक्शन नसल्याची माहिती दिली. वीज कनेक्शन न मिळाल्याने वृद्ध विधवा महिलेला अंधारात राहावे लागत होते. यामुळे या वृद्ध महिलेने IPS अनुकृती शर्मा यांना झोपडीत वीज कनेक्शन मिळावे, अशी विनंती केली होती.
यानंतर अनुकृती शर्मा यांनी खेडी गावात पोहोचून विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले आणि वृद्ध महिलेच्या झोपडीत कनेक्शन मिळवून दिले. आयपीएस अधिकाऱ्याच्या या कामामुळे महिलेच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. आयपीएस अनुकृती शर्मांच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वृद्ध विधवा महिला नूरजहाँ सांगते की, माझ्याकडे वीज कनेक्शन घेण्यासाठी पैसे नव्हते. झोपडीत वीज कनेक्शन मिळावे म्हणून एएसपी मॅडमकडे प्रार्थना केली होती. त्यानंतर मॅडमने त्यांचे वीज कनेक्शन करवून दिले. विशेष म्हणजे त्याचे पैसेही त्यांनीच दिले. आयपीएस अधिकारी अनुकृती शर्मा यांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.