रायपूर 06 मार्च : डॉक्टरांना अनेकदा देवाचा दर्जा दिला जातो. परंतु काही डॉक्टरांच्या कृतीमुळे वैद्यकीय व्यवसायही बदनाम होऊ लागलाय. असाच एक प्रकार छत्तीसगड राज्यातील कोरबा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये घडलाय. हॉस्पिटलमध्ये आलेल्या महिला रुग्णाला कानाखाली मारल्यानंतर या कॉलेजमधील एक डॉक्टर पुन्हा एकदा रुग्णाशी चुकीचं वर्तन केल्यानं चर्चेत आलाय. शनिवार (4 मार्च 2023) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर दारू पिऊन आला, व त्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेसह तिच्या कुटुंबाशी चुकीचं वर्तन केलं. याप्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यानंतर कॉलेजच्या डीननं गंभीर दखल घेत मॅनेजमेंटला पत्र पाठवलं असून संबंधित डॉक्टरच्या चौकशीचे आदेश दिलेत.
Mumbai Local मध्ये गांजा फुकणाऱ्या तरुणांचा Video तुफान Viral
मेडिकल कॉलेजमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या या डॉक्टरचं नाव डॉ. बद्धेश्वर सिंह कंवर आहे. त्याच्यावर आरोप आहे की, तो दारू पिऊन नशेमध्ये हॉस्पिटलमध्ये आला. या पूर्वी या डॉक्टरनं हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर हॉस्पिटल मॅनेजमेंटनं त्याच्यावर कारवाई केली होती. मात्र, कारवाई झाल्यानंतर सुद्धा डॉ.कंवर याचं वर्तन सुधारलं नाही. शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास तर तो दारू पिऊन थेट हॉस्पिटलमध्ये आला, आणि बर्न वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाला त्यानं विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर त्याने संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर अश्लील चाळे केले.
व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कुटुंबातील सदस्य चिडल्यानंतर तो डॉक्टर हॉस्पिटलमधून बाहेर आला. परंतु थोड्या वेळानं, तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊ लागला. मात्र, दारूची नशा जास्त झाल्यामुळे त्याला व्यवस्थित चालता येत नव्हते. त्यामुळे काही लोकांनी त्याला पकडून हॉस्पिटलमध्ये नेलं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
चौकशीचा आदेश
घटनेचं गांभीर्य ओळखून मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे डीन डॉ. अविनाश मेश्राम यांनी तत्काळ याबाबत मॅनेजमेंटला पत्र पाठवून संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच याप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, हॉस्पिटलमधील एका डॉक्टराच्या वागण्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास झालाय. आता यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी किती दिवसांमध्ये पूर्ण होईल, संबंधित डॉक्टरवर काय कारवाई होईल, याकडे अनेकांच लक्ष लागलं आहे. परंतु एका डॉक्टरामुळे कोरबा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे नाव खराब होऊ लागलं आहे. हॉस्पिटल व परिसरामध्ये या संपूर्ण प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.